Bollywood actress Talks about Facilities provided to male actors : स्त्री-परुष समानता हा वाद फक्त सामान्य माणसांपर्यंत मर्यादित नसून, कलाविश्वातही याबाबत अनेकदा चर्चा केली जाते. अनेकदा कलाकारांच्या याबाबत तक्रारी असल्याचे पाहायला मिळते. अशातच आता लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्रीने याबाबत तिचे अनुभव सांगितले आहेत.

बॉलीवूडमध्ये अनेकदा अभिनेत्री पुरुष कलाकारांच्या तुलनेत त्यांना दुय्यम वागणूक मिळाल्याचे मत व्यक्त करताना दिसतात. अशातच आता अभिनेत्री नुसरत भरुचा हिनेसुद्धा याबाबत तिचा अनुभव सांगितला आहे. तिनं नयनदीप रक्षितला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबतची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

नुसरत म्हणाली, “जेव्हा एखाद्या अभिनेत्याचा चित्रपट हिट होतो तेव्हा त्याला अनेक पर्याय उपलब्ध होतात; पण स्त्रियांना मात्र संघर्ष करावा लागतो. ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटापासून मी हेच सांगत आली आहे की, एका मुलीला तिथपर्यंत पोहोचायला खूप वेळ जातो. मी असं म्हणत नाहीये की, आम्हाला रातोरात यश हवं आहे; पण एका कलाकाराला त्याचा एखादा चित्रपट हिट झाला की, त्यानंतर आणखी चांगल्या चित्रपटांसाठी विचारणा व्हावी एवढंच वाटत असतं. त्यांना फक्त संधी हवी असते. आम्हाला अभिनेत्यांच्या तुलनेत कमी संधी मिळते”.

पुरुष कलाकारांना मिळणाऱ्या सोई-सुविधांबद्दल नुसरत म्हणाली, “काही वेळा असं घडलं आहे जेव्हा मी माझ्या पुरुष सहकलाकाराची व्हॅनिटी तो नसताना काही वेळासाठी वापरू शकते का, त्यातील बाथरूम वापरता येईल का यासाठी विचारलं आहे. कारण- ते माझ्या व्हॅनिटीपेक्षा काही पटींनी चांगले असायचे. मी तक्रार नाही करायचे; पण स्वत:ला सांगायचे की, मी इतकी मेहनत करेन की, न मागता मला या गोष्टी मिळतील”.

अभिनेत्री पुढे म्हणाली, “करिअरच्या सुरुवातीला मी विमानाने प्रवास करताना इकॉनॉमिक क्लासने प्रवास करायचे; पण आता तसं करत नाही. अगदीच घाई असेल आणि माझ्याकडे पर्याय नसेल, तरच मी त्या क्लासने प्रवास करते. जेव्हा माझ्याकडे पर्याय उपलब्ध झाले तेव्हा मी नेहमी बिझनेस क्लासनेच प्रवास केला आहे. एकदा एका चित्रपटात माझी छोटीशी भूमिका होती. तेव्हा आम्ही प्रवास करत होतो. ती आंतरराष्ट्रीय फ्लाइट होती. तेव्हा बाकी सर्व कलाकार बिझनेस क्लासमध्ये बसले होते आणि मला मात्र इकॉनॉमिक क्लासमध्ये सीट देण्यात आली. जिथे सर्व सहायक व क्रू मेंबर बसले होते. तो प्रवास खूप दूरचा होता.

“बिझनेस क्लासमध्ये बसलेल्या काही कलाकारांशी माझी मैत्री झाली होती. तेव्हा ते मला म्हणायचे नुश ये आमच्यामध्ये बस. तो एक पर्याय होता; पण मी म्हणाले नाही. कारण- मला इकडे जागा देण्यात आली आहे. पण मी तेव्हा ठरवलेलं की, मी इतकी मेहनत करेन की, नंतर ते माझीसुद्धा बिझनेस क्लासमध्ये व्यवस्था करतील. जिथे निर्मिती संस्था माझ्या तिकिटाचे पैसे भरतील; मला भरावे लागणार नाहीत आणि तसं झालंसुद्धा”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नुसरत भरुचाने पुढे तिच्याकडे दोन वर्षे काहीच काम नसल्याबद्दल सांगितले आहे. ती म्हणाली, “दोन वर्षे माझ्याकडे काहीच काम नव्हतं. हा तो काळ आहे जेव्हा माझे चित्रपट हिट होत होते”. तिने चित्रपटाचे नाव न सांगता म्हटले की, तिचा चित्रपट हिट झाल्यानंतर तिला एका सिनेमामधून मॅनेजमेंट एजन्सीनं काढून टाकलं होतं. त्यानंतर दोन वर्षं तिच्याकडे काही काम नव्हतं.