बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे चित्रपटसृष्टीतील मोठं नाव आहे. गेली कित्येक वर्षं त्यांनी चित्रपट, नाटक या दोन्ही क्षेत्रात अतुलनीय असं योगदान दिलं आहे. त्यांच्याबरोबरच त्यांनी पत्नी म्हणजेच रत्ना पाठक शाह सुद्धा हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या अभिनेत्री आहेत. आजही रत्ना ह्या छोट्यामोठ्या भूमिकांमधून आपली छाप रसिकांवर पाडत असतात.

आपल्या पतीप्रमाणेच रत्ना या त्याच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखल्या जातात. आपल्या वक्तव्यामुळे रत्ना पाठक या कायम चर्चेत असतात. नुकतंच त्यांनी सध्याच्या स्टार्सबद्दल भाष्य केलं आहे. फिल्म इंडस्ट्रीतील स्टार्स हे त्यांच्या वयाहून लहान मुलींबरोबर रोमान्स करतात याबद्दल रत्ना यांनी त्यांचं मत मांडलं आहे.

आणखी वाचा : ॲडव्हान्स बुकिंग सुरू होण्याआधीच ‘लिओ’च्या तिकीटांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल; नेमकं प्रकरण काय जाणून घ्या

‘इडिया टूडे’शी संवाद साधताना रत्ना पाठक शाह म्हणाल्या, “जर या कलाकारांना आपल्या वयाच्या अर्ध्याहून लहान असलेल्या अभिनेत्रींबरोबर रोमान्स करताना लाज वाटत नसेल तर यावर मी काय बोलू? मला बोलायला काहीच उरलेलं नाही. ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे.”

रत्ना पाठक यांनी टेलिव्हिजनवरही भरपूर काम केलं आहे. त्यांची ‘साराभाई वि. साराभाई’ ही मालिका चांगलीच गाजली. गेल्या काही वर्षात ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’, ‘खूबसूरत, ‘कपूर अँड सन्स’सारख्या चित्रपटातही रत्ना यांनी काम केलं. सध्या त्यांच्या आगामी ‘धक धक’ या चित्रपटाची चर्चा आहे. यात रत्ना यांच्यासह दिया मिर्झा, संजना सांघी व फातीमा सना शेख यांच्या प्रमुख भूमिका आहेत.