सुप्रसिद्ध नृत्यांगना व अभिनेत्री सुधा चंद्रन यांनी आपले नृत्य व अभिनयाने स्वतःला इडस्ट्रीत सिद्ध केलं. विविधांगी भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. वयाच्या तिसऱ्या वर्षी डान्समधून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या सुधा यांचा प्रवास सोपा नव्हता. त्यांचे वैयक्तिक आयुष्य व करिअरबद्दल जाणून घेऊयात.

१९८१ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी घडलेल्या एका घटनेमुळे सुधा चंद्रन यांचे बदलले. त्यांचा एक भयंकर अपघात झाला. या अपघातातून त्या बचावल्या, पण त्यांना पाय गमवावा लागला. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली, इन्फेक्शनमुळे डॉक्टरांना पाय कापावा लागला. या घटनेनंतरही सुधा हार मानली नाही आणि कृत्रिम पाय लावून नृत्य करणे सुरू ठेवले.

नृत्यामुळेच सुधा यांना ओळख मिळाली, पुढे त्यांना अभिनयाची संधीही मिळाली. एका प्रोजेक्टच्या शूटिंगदरम्यान सुधा यांची भेट रवी डांग यांच्याशी झाली. ते असोसिएट डायरेक्टर म्हणून काम करत होते. सुधा पहिल्या नजरेत रवी यांच्या प्रेमात पडल्या होत्या.

सुधा पहिल्या नजरेत पडलेल्या रवी यांच्या प्रेमात

रवी सुधा यांच्या स्वप्नातील राजुकमार होते. रवी आयुष्यभर साथ देतील, असा विश्वास पहिल्या भेटीपासूनच होता, असं त्या म्हणाल्या होत्या. रवीसाठी सुधा एक आदर्श जोडीदार आहेत. जुहू बीचवर रोमँटिक डेट, शूटिंग शेड्यूलमधून वेळ काढून एकमेकांना भेटत रवी व सुधा यांचं प्रेम बहरलं.

प्रेम म्हटलं की अडचणीचा उल्लेख येतोच. रवी व सुधा यांच्या प्रेमातही अनेक अडचणी आल्या. सुधाचे कुटुंबीय या नात्यासाठी तयार नव्हते. त्यांना रवीवर विश्वास नव्हता. तमिळ कुटुंबात जन्मलेल्या सुधा कुटुंबाच्या एकुलत्या एक व लाडक्या होत्या. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय समाजाबाहेर त्यांचं लग्न लावून द्यायला, नातं स्वीकारायला तयार नव्हते.

पळून जाऊन केलेलं लग्न

“माझ्या आईवडिलांनी आमच्या लग्नाला विरोध केला कारण तो पंजाबी आहे आणि मी तमिळ आहे. आम्ही त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते तयार झाले नाहीत. म्हणून आम्ही पळून जाण्याचा निर्णय घेतला. चेंबूरमधील चिरानगर मुरुगन मंदिरात आम्ही लग्न केले,” असं सुधा म्हणाल्या होत्या.

कायम एकमेकांबरोबर राहायचं, या निर्णयावर रवी व सुधा ठाम होते. त्यामुळे त्यांनी पळून जाऊन १९९४ साली चेंबूरमधील चिरागनगर मुरुगन मंदिरात एका छोट्या पारंपरिक विवाह सोहळ्यात लग्न केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाळ दत्तक घेण्याबद्दल सुधा यांनी व्यक्त केलेलं मत

सुधा व रवी यांच्या लग्नाला ३१ वर्षे झाली आहेत. हे दोघांना बाळ नाही. पण आई-वडील होऊ न शकल्याची खंत त्यांना नाही. एकमेकांची साथ असणं आयुष्य जगायला पुरेसं आहे, असं ते म्हणतात. बाळ दत्तक घेण्याबद्दल सुधा यांना विचारण्यात आलं होतं. “माझा व माझ्या पतीचा बाळ दत्तक घेण्यावर विश्वास नाही. यामुळे मुलांना वाटेल की ते त्याच्या आई-वडिलांवर ओझं आहे,” असं सुधा चंद्रन म्हणाल्या होत्या.