Aditya Pancholi and Zarina Wahab : झरीना वहाब आणि आदित्य पांचोली यांच्या संसाराला आता लवकरच चार दशकं पूर्ण होतील. पहिली भेट झाल्यावर अवघ्या १५ दिवसांत या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. अभिनेत्याच्या अनेक गर्लफ्रेंड्सनी त्याच्यावर गैरवर्तनाचे आरोप देखील केले आहेत. यावर भाष्य करत झरीनाने आदित्य उत्तम नवरा आणि बाबा असल्याचं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं. लग्न करताना आदित्य आणि झरीना या दोघांचेही धर्म वेगळे होते. मात्र, या गोष्टीचा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर कधीच परिणाम झाला नाही. याबद्दल ‘लेहरेन रेट्रो’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री व्यक्त झाल्या आहेत. त्या नेमकं काय म्हणाल्यात जाणून घेऊयात…

झरीना सांगतात, “त्या काळात ते व्हीएचएससाठी व्हिडीओ फिल्म बनवत होते. त्या टीमने मला फिल्म ऑफर केली होती. पण, मी काहिशी साशंक होते. सुरुवातीला मी त्यात काम करण्यासाठी तयार नव्हते. पण, त्यानंतर त्यांनी मला सांगितलं, हा एक चित्रपट आहे यामुळे कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत. म्हणून मी कालांतराने या प्रोजेक्टसाठी होकार दिला. तिथेच मी निर्मलला ( आदित्यचं आधीचं नाव ) पहिल्यांदा भेटले. तो माझ्यापेक्षा लहान आणि दिसायला पण चांगला मुलगा. तुम्हाला कोणाला विश्वास बसणार नाही पण, त्यानंतर अवघ्या १५ ते २० दिवसांत आमचं लग्न झालं. माझ्या नशिबात खरंतर माझा पती अशाप्रकारे मला भेटेल हे आधीच लिहिलं होतं कारण, मला तो चित्रपट सुद्धा करायचा नव्हता.”

दोघांचेही धर्म वेगळे होते त्यामुळे लग्न करताना काही अडचणी आल्या का? याबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणाल्या, “जेव्हा मी त्याच्याशी लग्न केलं, तेव्हा प्रत्येकजण म्हणत होता की, तो दिसायला सुंदर आहे. त्यात तरुण आहे. हे लग्न पाच महिन्यांहून अधिक काळ टिकणार नाही पण, आता आमच्या लग्नाला ३६ वर्षे झाली आहेत. आमच्या घरात आज देवाची पूजा केली जाते. मी नमाज पठण करते. आम्ही आमच्या घरात धर्माच्या आधारावर कोणताही भेदभाव करत नाही, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. आजच्या घडीला आमच्याकडे आवश्यक ते सर्वकाही आहे… माझे सासरेसुद्धा खूप छान आहेत. तेव्हा सुद्धा कोणतेही अडथळे नव्हते.”

लग्नाआधी आदित्यने इस्लाम धर्म स्वीकारला का? यावर अभिनेत्री सांगतात, “आमचा निकाह झाला पण, त्याने धर्मांतर केलं नाही. मुस्लीम प्रथेनुसार त्याला त्याचं नाव बदलावं लागलं. त्याप्रमाणे त्याने नावात बदल केला.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आमच्या मुलीचं नाव आम्ही पाकिस्तानी शो पाहून सना ठेवलं होतं. तर, मुलाचं नाव सूरज हे आदित्यच्या एका व्यक्तिरेखेचं नाव होतं. मुलांना कोणती नावं द्यायची यावर आमची कोणतीही चर्चा झालेली नाही. आमच्या दोघांमध्ये धर्म कधीच आला नाही. अगदी निर्मलचं सुद्धा हेच मत होतं. माणूस म्हणून तो खूपच छान आहे” असं झरीना वहाब यांनी सांगितलं.