Ahaan Panday Starrer Saiyaara Is Copy Of A Korean Movie A Moment To Remember : सध्या सोशल मीडियासह सर्वत्र ‘सैयारा’ची चर्चा सुरू आहे. मोहित सुरी यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. परंतु, आता चित्रपटाबाबत एक नवीन माहिती समोर येत आहे. ‘सैयारा’ चित्रपट यामुळे अडचणीत सापडल्याचं दिसतं. या चित्रपटाची कथा मोहित सुरी यांची नसून, हा एका कोरियन चित्रपटाचा रिमेक असल्याचं म्हटलं जात आहे.

‘सैयारा’ चित्रपटाची तरुणांमध्ये विशेष क्रेझ असल्याची दिसते. प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटानं अनेकांचं लक्ष वेधलं आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेले अहान पांडे व अनित पड्डा हे कलाकार यामुळे विशेष चर्चेत आले. सोशल मीडियावरही अनेक जण ‘सैयारा’चं कौतुक करताना दिसतायत. परंतु, आता काहींनी हा चित्रपट एका कोरियन चित्रपटाचा रिमेक असल्याचं म्हटलं आहे.

काही नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर हा चित्रपट ‘अ मोमेंट टू रिमेंबर’ या कोरियन चित्रपटाचा रिमेक असल्याचं म्हटलं आहे. २००४ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. जॉन एच ली दिग्दर्शित या चित्रपटात सन ये-जिन आणि जंग वू-सुंग यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

क्रिश कपूर (अहान पांडे) एक तापट स्वभावाचा म्युझिशियन आणि वाणी (अनित पड्डा) जिला एक पत्रकार व्हायचं असतं. काही विचित्र घटनांमुळे या दोघांची भेट होते. अशी काहीशी ‘सैयारा’ चित्रपटाची कथा असल्याचं म्हटलं जात आहे. अशातच आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हा कोरियन चित्रपटाचा रिमेक असून, एक्सवर या दोन्ही चित्रपटांची तुलना केली जात आहे. काहींनी ‘सैयारा’ रिमेक असल्यानं नाराजी व्यक्त केली.

एक्सवर एका नेटकऱ्यानं “‘सैयारा’ २००४ साली प्रदर्शित झालेल्या ‘अ मोमेंट टू रिमेंबर’ या चित्रपटाचा रिमेक आहे.” असं म्हटलं आहे. यावेळी त्यानं दोन्ही चित्रपटांचे फोटो शेअर केले आहेत. अजून एका नेटकऱ्यानं, “मला ‘सैयारा’ची कथा मी कुठेतरी पाहिली आहे, असं वाटत होतं; पण त्या चित्रपटाचं नाव आठवत नव्हतं. मात्र आता मला ते आठवलं असून, त्या चित्रपटाचं नाव ‘अ मोमेंट टू रिमेंबर’ आहे. हा एक अप्रतिम चित्रपट आहे. मोहित सुरी आणि यशराज प्रॉडक्शन यांनी योग्य पद्धतीने ‘सैयारा’ची बांधणी केली आहे. मी अपेक्षा करतो की, लोकांनी ‘अ मोमेंट टू रिमेंबर’ हा चित्रपटसुद्धा पाहावा”.

यासह एका नेटकऱ्यानं ‘सैयारा’ हा चित्रपट कॉपी असल्याचं म्हटलं असून, पुढे त्यानं, “मोहित सुरी यांच्या चित्रपटांमध्ये कधीतरी क्वचितच त्यांची स्वत:ची मूळ कथा असल्याचं पाहायला मिळतं”, असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्यानं, ‘सैयारा’ हा कोरियन चित्रपटाचा रिमेक असून, मोहित सुरी यांचा ‘एक व्हिलन’सुद्धा आय सो डेव्हिल (I Saw Devil) या चित्रपटाचा रिमेक होता”.

‘सैयारा’बाबत सोशल मीडियावर तो रिमेक असल्याची चर्चा सुरू असताना काहींनी या चित्रपटाची बाजू घेतल्याचं दिसतं. एकानं सोशल मीडियावर, “अल्झायमरसारखा विषय आपण इतर काही चित्रपटांमध्येसुद्धा पाहिला आहे. ‘सैयारा’ हा रिमेक नाहीये. मी कोरियन सिनेमाचा एक चाहता असूनही हे बोलत आहे. अर्थात, तुम्हीसुद्धा तुमची मतं मांडू शकता. माहितीसाठी सांगतो ‘अ मोमेंट टू रिमेंबर’ हा चित्रपट एका जपानी टीव्ही शोवर आधारित होता”.