बॉलीवूड अभिनेता अजय देवगण आणि मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखचा ‘रेड २’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रेड’ या चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे. यामध्ये पुन्हा एकदा अजयने आयकर विभाग अधिकारी अजय पटनायकची भूमिका साकारली आहे. या दुसऱ्या भागात त्याचा सामना दादाभाई म्हणजेच अभिनेता रितेश देशमुखशी होणार आहे. एका प्रामाणिक अधिकाऱ्याचा सामना जेव्हा भ्रष्ट राजकारण्याशी होतो, तेव्हा काय घडतं? हे या चित्रपटातून पहायला मिळत आहे. यामध्ये अजय आणि रितेशबरोबरच वाणी कपूरचीही मुख्य भूमिका आहे.

‘रेड २’ मध्ये झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री

अजय देवगण, रितेश देशमुख आणि वाणी कपूरसह ‘रेड २’ मध्ये एक मराठी अभिनेत्रीही झळकली आहे आणि ही अभिनेत्री म्हणजे रितिका श्रोत्री. रितिकाने स्वत: याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. रितिका सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असते. सोशल मीडियावर अभिनेत्री तिचे अनेक स्टायलिश लूकमधील फोटो शेअर करत असते. त्याचबरोबर काही मजेशीर, ट्रेंडिंग रील व्हिडीओही शेअर करत असते. अशातच तिने रेड २मध्ये साकारलेल्या भूमिकेची माहिती सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे.

‘रेड २’ मधील भूमिकेबद्दल रितिका श्रोत्रीने व्यक्त केला आनंद

रितिकाने सोशल मीडियावर ‘रेड २’ चित्रपटच्या पोस्टरबरोबरचा फोटो शेअर करत “मी ‘रेड २’ या चित्रपटात एक भूमिका साकारली आहे” असं म्हटलं आहे. त्याचबरोबर तिने “तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहा आणि आनंद घ्या” असंही म्हटलं आहे. रितिकाने ही पोस्ट शेअर करताच अनेक कलाकार व चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे. पार्थ भालेराव, कृतिका देव, निखिल बने, तेजस बर्वे, विभावरी देशमुखसह अअनेक कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

रेड २ मध्ये अजय देवगण आणि रितेश देशमुखमध्ये खडाजंगी

‘रेड २’ चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर अमय पटनायक (अजय देवगण) या आयकर विभागातील प्रामाणिक अधिकाऱ्यावर लाच मागितल्याचा आरोप होतो आणि त्याची बदली केली जाते. तिथला स्थानिक राजकारणी दादाभाई (रितेश देशमुख) जनतेमध्ये लोकप्रिय असतो. परंतु त्याच्याबाबतीत काहीतरी गडबड असल्याचा संशय अमयला येतो आणि त्याच्या घरी, कार्यालयात तो छापा टाकतो. यानंतर दोघांमध्ये होणारी खडाजंगी या चित्रपटात पहायला मिळते.

रेड २ मध्ये अजय देवगण आणि रितेश देशमुखसह ‘हे’ कलाकार

अजय देवगणने आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत अत्यंत चोख काम केलं आहे. तर दुसरीकडे रितेश देशमुखने खलनायकाच्या भूमिकेत जबरदस्त काम केलंय. शिवाय यशपाल शर्मा, अमित सियाल आणि बृजेंद्र काला यांनीसुद्धा विशेष छाप सोडली आहे. चित्रपटात रितेशच्या आईची भूमिका साकारणाऱ्या सुप्रिया पाठक आणि अजयच्या बॉसच्या भूमिकेतील रजत कपूर यांनीही उल्लेखनीय काम केलं आहे. आज १ मे रोजी ‘महाराष्ट्र दिना’निमित्त हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.