Ajay Devgn Reacted On Marathi Hindi Language Row : अजय देवगण लवकरच त्याच्या नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता त्याच्या ‘सन ऑफ सरदार २’ या चित्रपटातून झळकणार आहे. त्याच्यासह यामध्ये मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूरही झळकणार आहे. सध्या दोघे चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. अशातच सध्या राज्यात सुरू असलेल्या मराठी-हिंदी वादावर अभिनेत्याने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

अजय देवगण व मृणाल ठाकूर यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘सन ऑफ सरदार २’ हा चित्रपट २५ जुलै रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. सध्या ही कलाकार मंडळी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. अशातच या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने एका कार्यक्रमात अजय देवगण व मृणाल ठाकूर एकत्र उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी अजय देवगणला एका पत्रकाराने सध्या सुरू असलेल्या मराठी-हिंदी वादाबद्दल प्रश्न विचारला.

‘बझझूका स्क्रोल’ने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये अभिनेता याबद्दल बोलताना दिसत आहे. यावेळी त्याला “काही कलाकारांनी याबाबत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत तुझं यावर काय मत आहे”, असा प्रश्न विचारल्यावर आधी अजय देवगण म्हणाला, “मी वाट बघत होतो कोण मला हा प्रश्न विचारणार आहे याची”.

अभिनेता पुढे मराठी-हिंदी वादाबाबत म्हणाला, “सध्या जे सुरू आहे, त्याबद्दल मला एवढंच म्हणावंसं वाटतं की, आता माझी सटकली”. अजय देवगणचं हे उत्तर ऐकून तेथील उपस्थितांनी हास्यकल्लोळ केला. यावेळी अभिनेत्यासह मंचावर मृणाल ठाकूरही उपस्थित होती. अजय देवगणपूर्वी अभिनेत्री शिल्पा शेट्टीलादेखील याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिल्पा शेट्टी तिच्या ‘केडी’ या चित्रपटाचं प्रमोशन करत असताना त्या कार्यक्रमादरम्यान तिला याबाबत विचारण्यात आलेलं. यावर अभिनेत्री म्हणालेली, “मला मराठी माहीत आहे. मी महाराष्ट्राची मुलगी आहे; पण आज आपण ‘केडी’ चित्रपटाबद्दल बोलण्यासाठी जमलो आहोत. त्यामुळे कुठल्याही वादग्रस्त विषयावर आम्ही बोलणार नाही. आमचा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे. त्यामुळे आम्ही मराठीतही तो प्रदर्शित करू शकतो”.