Akshay Kumar Cancel Trailer Launch After Air India Plane Crash : अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात एअर इंडियाच्या प्रवासी विमानाचा मोठा अपघात झाला आहे. या विमानातून २४२ प्रवासी प्रवास करत होते. शिवाय हे विमान निवासी भागात कोसळल्यामुळे स्थानिक इमारतींचंही मोठं नुकसान झालं आहे. हे विमान लंडनला जात होतं, मात्र टेकऑफनंतर काही मिनिटांतच ते खाली कोसळलं. दरम्यान, अहमदाबाद विमान अपघातानंतर बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

अहमदाबाद दुर्घटनेवर अनेक सेलिब्रिटींनी पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेवर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. “एअर इंडियाच्या विमान अपघाताची बातमी समजल्यावर प्रचंड धक्का बसला, मी नि:शब्द झालो आहे.” असं अक्षयने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. याशिवाय त्याने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

अक्षय कुमारची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या ‘कन्नप्पा’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चचा कार्यक्रम आज ( १२ जून ) इंदूर येथे पार पडणार होता. मात्र, विमान दुर्घटनेनंतर अभिनेत्याने मोठा निर्णय घेत हा कार्यक्रम रद्द केला आहे. ‘कन्नप्पा’ चित्रपटाच्या टीमने हा ट्रेलर रिलीज कार्यक्रम एक दिवस पुढे ढकलला आहे.

“अक्षय कुमार आणि विष्णू मंचू यांनी इंदूर येथे होणारा ट्रेलर लॉन्च सोहळ्याचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे. अहमदाबादमध्ये येथे झालेल्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या घटनेनंतर सगळ्यांनाच धक्का बसला आहे. ज्यांनी या अपघातात प्राण गमावले, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. या कठीण काळात आम्ही त्यांच्या कुटुंबीयांबरोबर आहोत.” असं ‘कन्नप्पा’ सिनेमाच्या टीमने स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, ‘कन्नप्पा’ या सिनेमाबद्दल सांगायचं झालं, तर हा मुकेश कुमार सिंग दिग्दर्शित आणि मोहन बाबू यांची निर्मिती असलेला तेलुगू सिनेमा आहे. २७ जूनला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विष्णू मंचू, अक्षय कुमार, प्रभास, काजल अग्रवाल आणि मोहनलाल एकत्र झळकणार आहे.