अक्षय कुमारने बॉलीवूडमध्ये नुकतीच ३८ वर्षे पूर्ण केली आहेत. या काळात त्याच्या करिअरमध्ये चढ-उतार आले. त्याने ब्लॉकबस्टर सिनेमे दिले, त्याचबरोबर एकापाठोपाठ एक अनेक फ्लॉप चित्रपटही त्याने केले. प्रेम, अफेअर, लग्न यामुळेही अक्षय चर्चेत राहिला. अक्षयचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याचं कारण त्याच्या अभिनयाबरोबरच फिटनेस आहे.
एबीपी न्यूजशी बोलताना अक्षयने त्याच्या दीर्घकालीन यशाचे श्रेय नशिबाला दिले. तसेच इंडस्ट्रीत अनेक जण त्याच्यापेक्षा जास्त शिक्षित, देखणे व पात्र आहेत, पण नशीब चांगलं असल्याने काम व यश मिळालं, असं अक्षय म्हणतो. अक्षय कुमार आता ५७ वर्षांचा आहे. तो खूप फिट आहे. त्याने त्याच्या फिटनेसचे सिक्रेट सांगितले आहे.
अक्षय कुमार काम व व्यायामात व्यग्र असतो. तरीही त्याला त्याच्या समकालीन कलाकारांचे चित्रपट पाहण्यासाठी वेळ मिळतो का? असा प्रश्न विचारण्यात आला. अक्षय म्हणाला, “अर्थात, कारण माझ्याकडे दुसरं काही काम नाही, कारण मी तेवढा शिक्षित नाही. माझं शिक्षण फार नसल्याने मी फक्त चित्रपटांमध्ये काम करतो, त्यामुळे मला भरपूर वेळ मिळतो.”
परिश्रमाबरोबरच नशिबाची साथ महत्त्वाची
करिअरमध्ये नशिबाने महत्त्वाची भूमिका बजावली, असं अक्षय म्हणतो. “तुमचं नशीब चांगलं असावं लागतं, असं मला वाटतं. मी नशिबावर विश्वास ठेवतो. मी अनेकदा लोकांशी वाद घालतो की मी आता ५८ वर्षांचा आहे आणि माझा अनुभव मला सांगतो की कठोर परिश्रम महत्वाचे आहे, पण त्याचबरोबर नशीबही असावं लागतं. यशस्वी होण्यासाठी ७०% नशीब आणि ३०% कठोर परिश्रमाची आवश्यकता असते,” असं मत अक्षय कुमारने मांडलं.
जिलेबी, बर्फी सगळंच खातो अक्षय कुमार
५७ वर्षांच्या अक्षय कुमारने त्याचा आहार, सवयी याबद्दल मोकळेपणाने सांगितले. तो फिट आहे, त्यामुळे गोड, मसालेदार पदार्थ टाळत असेल, असं अनेकांना वाटतं. पण तो अनेक चमचमीत व चटपटीत पदार्थ खातो, असा खुलासा त्याने स्वतः केला आहे. “हो, मी छोले पुरी खातो. मी सतत कॅलरीज किंवा प्रथिने मोजत नाही. कोणालाच विश्वास नसला तरी मी खरंच सामान्य जीवन जगतो. मी जिलेबी आणि बर्फी खातो, मला जे काही खायचं आहे ते मी खातो.”
२० वर्षांपासून एक नियम पाळतो अक्षय कुमार
अक्षय कुमार आवडते पदार्थ खात असला, तरी तो एक कडक नियम पाळतो. “मी संध्याकाळी ६:३० नंतर काहीही खात नाही. २० वर्षांपासून मी हा नियम पाळतोय. कधीकधी असं घडतं की एखाद्या मित्राचा वाढदिवस असतो किंवा काहीतरी असतं. त्यावेळी तुम्हाला केक चाखावा लागतो. मी तर ड्रिंक करताना लोकांना मूर्ख बनवतो. मी त्यांच्याबरोबर चिअर्स करतो, पण नंतर फेकून देतो. कारण मला दारू आवडत नाही,” असं अक्षय कुमारने नमूद केलं.
अक्षय कुमारचा ‘जॉली एलएलबी ३’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. यात अर्शद वारसीदेखील मुख्य भूमिकेत आहे. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार ९३.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.