Akshay Kumar Fan Car Story : कलाकारांवरील चाहत्यांच्या प्रेमाला काही सीमा नाही. आपल्या आवडत्या कलाकारासाठी चाहते काय करतील आणि काय नाही, याचा नेम नाही. बॉलीवूडच्या अनेक कलाकारांसाठी त्यांच्या चाहत्यांनी हटके गोष्टी केल्याचं पाहायला मिळालं आहे. कोणी आपल्या आवडत्या अभिनेत्याचं टॅटू काढतो; तर कोणी आवडत्या कलाकाराची स्टाईल कॉपी करतो. अशातच एका चाहत्यानं आपल्या अभिनेत्यासाठी चक्क स्वत:च्या हातांनी महागडी कार बनवली आहे.

बॉलीवूडचा खिलाडी म्हणजेच अभिनेता अक्षय कुमारचे देशभरात अनेक चाहते आहेत. अशातच हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील मेहमजवळील खेरी गावचा २१ वर्षीय पंकज हा अक्षयचा खूप मोठा चाहता आहे. अक्षय कुमारवरील प्रेमापोटी त्यानं चक्क स्वत:च्या हातांनी रॉल्स-रॉयससारखी एक लक्झरी कार बनवली आहे. रोहतकमधील एका ऑटोमोबाईल सर्व्हिस सेंटरमध्ये डेंटर म्हणून काम करणाऱ्या पंकजने आपली नोकरी सोडली आणि पाच महिन्यांत त्यानं अक्षयला देण्यासाठी स्वत:च्या हातांनी रॉल्स-रॉयससारखी कार बनवली आहे.

News 18च्या वृत्तानुसार, अक्षयला कार भेट म्हणून देण्यासाठी त्यानं चार लाख रुपयांचं कर्ज काढलं आहे. रोहतक, दिल्ली, भिवानी व हिसारहून त्यानं स्पेअर पार्टस् गोळा केले आणि ही गाडी बनवली. सुरुवातीला या सगळ्याला पंकजच्या वडिलांचा विरोध होता; पण नंतर त्यांनीही मदत केली आणि त्याच्या स्वप्नाला आर्थिक आधार दिला. ऑक्टोबरपर्यंत ही कार तयार झाली. ldयानंतर कार देण्यासाठी पंकजनं अक्षय कुमारच्या टीमशी संपर्क साधला. मग टीमनं त्याला मुंबईला येण्यास सांगितलं.

हेही वाचा

पंकजनं ही कार ट्रकनं मुंबईला पाठवली, ज्यासाठी त्याला १.१० लाख रुपये खर्च आला. तसेच पंकज स्वत:सह आठ गावकऱ्यांना सोबत घेऊन मुंबईकडे आला. त्यात त्याला जेवण आणि राहण्यासाठी १.२० लाख रुपये झाले. तसेच या प्रवासासाठी त्यानं भाड्यानं कार घेतली, ज्यासाठी त्याला ५०,००० रुपये खर्च आला. पण, हा प्रवास त्याच्यासाठी आर्थिक आणि मानसिक भार ठरला. कारण- मुंबईत पोहोचल्यानंतर पंकजला खूप मोठा धक्का बसला.

पंकज सहा दिवस अक्षय कुमारच्या घराबाहेर थांबला होता. सहा दिवसांनी त्याला अक्षय कुमार दिसला; पण अगदी थोडक्यात भेट घेऊन अक्षय परत गेला. त्यानं नंतर भेटण्यास सांगितलं. पुन्हा दोन दिवसांनी अक्षयच्या टीमनं कळवलं की, अक्षय कुमार परदेशात गेले आहेत. अक्षयला गाडी दाखवण्याची किंवा भेट घेण्याची संधी न मिळाल्यानं पंकज निराश झाला आणि शेवटी १९ ऑक्टोबर रोजी तो निराश होऊन पुन्हा आपल्या गावी परतला.

यादरम्यान, पंकजच्या कुटुंबावर आता तब्बल आठ लाख रुपयांचं कर्ज झालं आहे. पंकज आता काही चित्रपट आणि नाटकांच्या चित्रीकरणासाठी त्यानं अक्षयसाठी बनवलेली कार भाड्यानं देईल; जेणेकरून कर्ज फेडण्यासाठी त्याला काहीतरी मदत होईल. तसेच १० नोव्हेंबर रोजी त्यानं रोहतकमधील महिंद्रा कंपनीत डेंटर म्हणून पुन्हा नोकरी सुरू केली.