बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टने नुकतंच ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये हजेरी लावत पदार्पण केलेलं. अशातच अभिनेत्रीने आता त्यादरम्यानचा एक व्हिडीओ तिच्या यूट्यूब चॅनेलवरून शेअर केला आहे. यामध्ये तिने कान्स फिल्म फेस्टिव्हलदरम्यान केलेल्या सर्व लूकसाठी कशी तयारी केली हे पाहायला मिळत आहे. परंतु, या व्हिडीओमधील एका गोष्टीने तिच्या चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

आलियाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मधील काही खास क्षण दाखवले आहेत. यावेळी ती रेड कार्पेटसाठी तयारी करत असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओमध्ये आलिया भट्ट तयारी करत असलेल्या रुममध्ये तिच्यासाठी एक नोट लिहिलेली दिसते, ज्यावर तिचं नाव आलिया कपूर असं लिहिलेलं पाहायला मिळतं. यावरून आलियाने रणबीर कपूरसह लग्न केल्यानंतर तिचं भट्ट हे आडनाव न लावता नवऱ्याचं आडनाव आपल्या नावामागे जोडल्याचं म्हटलं जात आहे.

आलियाने शेअर केलेल्या व्हिडीओमधील तिचं आलिया कपूर असं नाव लिहिलेला फोटो तिच्या एका चाहत्याने सोशल मीडियावर पोस्ट केला, ज्याने तिच्या चाहत्यांचं लक्ष वेधलं. तिच्या त्या चाहत्याच्या मते अभिनेत्रीने कागदोपत्री तिच्या नावामागे रणबीर कपूरचं कपूर हे आडनाव जोडलं असेल आणि बहुतांश लोक तिला भट्ट या आडनावानेच ओळखत असल्याने तिने त्यांच्यासाठी तेच राहू दिलं असावं. तर दुसऱ्याने म्हटलं आहे, “तिला कोणतं आडनाव नावामागे जोडायचं आहे हा सर्वस्वी तिचा निर्णय आहे. पण, तरी मला असं वाटतं की आलिया भट्ट याच नावात जास्त वजन आहे. आलिया कपूर खूपच सामान्य वाटतं आणि मला असं वाटतं की, दक्षिण दिल्लीत आलिया कपूर या नावाने अनेक मुली असतील, त्यामुळे निदान तिने लोकांसाठी तरी आलिया भट्ट हेच नाव ठेवावं.”

आलिया भट्टच्या आलिया कपूर या नावावरून एका नेटकऱ्याने असंही म्हटलं आहे, आलियाने कागदोपत्री तिचं नाव आलिया कपूर असं केलं असावं, म्हणून त्या हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी तिचं नाव आलिया कपूर असं लिहिलं असेल. या व्यतिरिक्त आलियाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती रेड कार्पेटसाठी तयार होताना मज्जा करताना दिसतेय. “रेड कार्पेटसाठी मी काहीशी उत्सुक, काहीशी नर्व्हस अशा द्विधा मनस्थितीत आहे,” असं अभिनेत्रीने म्हटलं आहे. तर या व्हिडीओमध्ये आलिया तिच्या चाहत्यांना ऑटोग्राफ देताना दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आलिया भट्ट व रणबीर कपूर यांनी २०२२ रोजी लग्न केलं होतं. या जोडप्याला राहा नावाची मुलगी आहे. सध्या आलियाच्या कपूर आडनावावरून जरी चर्चा होत असली तरी लग्नानंतर काम केलेल्या एकाही चित्रपटात अभिनेत्रीने तिच्या नावामागे कपूर हे आडनाव जोडल्याचं दिसलं नाही.