Mukesh Bhatt Talks About Alia Bhatt : आलिया भट्ट बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती अनेकदा व्यावसायिक आयुष्यासह खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. अभिनेत्री अशातच आता पुन्हा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तिचा सावत्र भाऊ राहुल भट्टने ती पूजा भट्टपुढे पाणी कम आहे अशी प्रतिक्रिया दिलेली. अशातच आता भट्ट कुटुंबातील अजून एका व्यक्तीने तिच्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
आलिया भट्टबद्दल तिचे काका मुकेश भट्ट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुकेश भट्ट हे महेश भट्ट यांचे भाऊ आहेत. मुकेश भट्ट बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते आहेत. त्यांनी नुकतीच ‘लेहरे रेट्रो’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आलिया भट्टबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. या मुलाखतीत त्यांनी आलिया भट्टच्या लग्नासाठी त्यांना आमंत्रित केलं गेलं नव्हतं आणि त्यांनी अजून त्यांची नात राहालाही पाहिलं नसल्याची खंत व्यक्त केली आहे.
आलिया भट्टबद्दल मुकेश भट्ट यांची प्रतिक्रिया
मुकेश भट्ट म्हणाले, “मी जर मला वाईट वाटलं नाही असं म्हटलं तर ते चुकीचं ठरेल, कारण मला खरंच खूप वाईट वाटलं. माझं आलियावर खूप प्रेम आहे आणि फक्त तीच नाही तर शहीनवरसुद्धा आहे, त्यामुळे जेव्हा तिचं लग्न होतं होतं, मला वाटलेलं माझ्या लेकीचं लग्न आहे, मी खूप उत्सुक होतो.”
आलिया व रणबीर कपूरच्या लेकीबद्दल मुकेश भट्ट म्हणाले, “मला जेव्हा कळलं की आलिया गरोदर आहे आणि तिला बाळ झालं आहे, तेव्हा राहाला पाहण्यासाठी मी खूप आतुरतेने वाट पाहत होतो. मला मुलं खूप आवडतात.” पुढे मुकेश यांनी आलिया भट्टबरोबर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही, कारण त्यांना वाटलं यामुळे आलियाला संकोच वाटेल, असं त्यांनी मुलाखतीत सांगितलं आहे.
मुकेश भट्ट याबद्दल म्हणाले, “मी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही, कारण मला तिला संकोच वाटेल असं काही करायचं नव्हतं. मला तिला अशा परिस्थितीत अडकवायचं नव्हतं, जिथे तिला ती जर मला भेटली तर तिचे वडील काय विचार करतील असा प्रश्न पडेल. मी तिला इथूनच आशीर्वाद दिले.”
दरम्यान, मुकेश भट्ट व महेश भट्ट या दोन भावांमध्ये त्यांच्या ‘विशेष फिल्मस’ या कंपनीमुळे वाद झाला असून, ‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार मुकेश यांनी २०२१ मध्ये महेश भट्ट या कंपनीचा भाग नसतील अशी घोषणा केली होती आणि हा निर्णय त्यांनी न भांडता चर्चा करून घेतल्याचं म्हटलं होतं. या नंतर मुकेश यांनी ते कर्जबाजारी झाल्याचं म्हटलं.
