Aliya Bhatt Praises Ahaan Pandey Starrer Saiyaara Movie : मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैयारा’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. शुक्रवारी (१८ जुलै) रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांचा त्याला तुफान प्रतिसाद मिळत असल्याचं बॉक्स ऑफिसवरील आकडेवारी पाहिल्यानंतर समजतं. अशातच आता अभिनेत्री आलिया भट्टनेसुद्धा या चित्रपटासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे.

अहान पांडे व अनित पड्डा यांनी या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. यामधून हे दोघे पहिल्यांदाच मुख्य भूमिका साकारत आहेत. परंतु, असं असतानाही प्रेक्षकांमध्ये त्यांची चर्चा असल्याचं पाहायला मिळतं. आता बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्टनेही या दोघांचं आणि चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

आलिया भट्टने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने मोहित सुरी, अहान पांडे व अनित पड्डा यांचा फोटो शेअर करत त्याला कॅप्शन देत चित्रपटाबद्दलची तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आलिया भट्टला हा चित्रपट खूप आवडल्याचं तिच्या पोस्टमधून पाहायला मिळतं.

आलियाने या पोस्टमधून असं म्हटलं की, “असं म्हणायला हरकत नाही की, दोन अप्रतिम कलाकार जन्माला आले आहेत.” अभिनेत्री पुढे म्हणाली, “मला आठवत नाही, यापूर्वी मी कधी कोणत्या कलाकारांचं इतकं कौतुक केलं होतं. हा चित्रपट पाहताना मला तुमच्या डोळ्यांमध्ये वेगळीच चमक दिसली. दोघांनीही वैयक्तिकपणे तुमच्या भूमिका खूप खरेपणाने साकारल्या आहेत.”

आलिया अहान व अनित यांचं कौतुक करत पुढे म्हणाली, “मी खरं सांगेन, मी पुन्हा पुन्हा हा चित्रपट पाहू शकते. यापूर्वी तुम्हा दोघांना हे सांगितलं होतं, पण एकदा सांगणं मला पुरेसं वाटत नाही. त्यामुळे पुन्हा सांगत आहे.” आलियाने यासह चित्रपटाचे दिग्दर्शक मोहित सुरी यांचंही कौतुक केलं आहे. ती म्हणाली, “खूप कमाल चित्रपट आहे, कमाल संगीत आहे, ‘सैयारा’ खूप उत्कृष्ट चित्रपट आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आलियाने यासह ‘सैयारा’च्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करत त्यांचंसुद्धा कौतुक केलं आहे. शेवटी अभिनेत्री असं म्हणाली, “हा फक्त एक चित्रपट नाही तर एक क्षण आहे.” या पोस्टखाली ‘सैयारा’ची नायिका अनित पड्डाने आलियाचे आभार मानत म्हटलं की, “तू माझी आयडॉल आहेस, कायम होतीस, धन्यवाद.” अनितसह मोहित सुरी यांनी या पोस्टखाली ‘लव्ह यू’ अशी कमेंट केली आहे.