अमाल मलिक हा एक यशस्वी संगीतकार आहे. तो त्याच्या लोकप्रिय गाण्यांव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. काही महिन्यांपूर्वी आई-वडिलांपासून संबंध तोडत असल्याचं अमालने जाहीर केलं होतं. आता त्याचं आई-वडिलांशी नातं चांगलं झालं आहे. अमालने एका मुलाखतीत पैसे कमावणे तसेच त्याच्या खर्च करण्याच्या सवयींबद्दल सांगितलं.
अमाल मलिकने सिद्धार्थ कन्ननला मुलाखत दिली. या मुलाखतीत अमालने आर्थिक व्यवहारांबाबत माहिती दिली. अमाल शाळेत असल्यापासून अकाउंट्सचा एक हुशार विद्यार्थी होता. त्याचे पैसे तोच सांभाळतो, पण त्याची पैसे खर्च करण्याची पद्धत त्याच्या आईला आवडत नाही. “माझ्या आईचं पैशांशी खूप वेगळं नातं आहे. माझे जेवणाचे बिल २० हजार का आहे किंवा मी अचानक एकाच दिवसात एक लाख रुपये का खर्च केले, हे तिला कधीच समजणार नाही. मी पैसे कशावर खर्च करतो त्याबाबत वडिलांना सर्व माहिती देतो, पण आईबद्दल काळजी घ्यावी लागते, कारण ती माझ्या खर्चांमुळे नाराज असते,” असं अमाल मलिक म्हणाला.
मी खूप उदार आहे- अमाल मलिक
अमालच्या मते, पैशांबद्दलची त्याची मानसिकता त्याच्या आईपेक्षा खूप वेगळी आहे. एखादं खास निमित्त असतं तेव्हा तो पैसे खर्च करण्यापासून स्वतःला रोखत नाही. “कधीकधी एखाद्या इव्हेंटनंतर मी पार्टीला जात असतो किंवा मी माझ्या लोकांना बाहेर घेऊन जातो, त्यावेळी मी खूप पैसे खर्च करतो. त्या बाबतीत मी खूप उदार व्यक्ती आहे. मी पैसे साठवून ठेवावे, असं मला वाटत नाही. मला वाटतं की पैसे कमावले आहेत तर ते खर्च करायला हवे,” असं अमाल म्हणाला. पैशांबद्दलचा आईचा दृष्टिकोन समजतोय, कारण तिने खूप गरिबी अनुभवली आहे. वडिलांचं संगीतकार म्हणून करिअर अपयशी ठरल्यानंतर आईला जे अनुभव आले त्यामुळे तिचा पैशांबद्दलचा दृष्टिकोन असा झाला आहे.
पैशांची पर्वा नसल्याने करिअरमध्ये अनेक मोठे पेमेंट्स सोडून दिले, असं अमालने नमूद केलं. तसेच बरेच मोठे निर्माते पैसे देण्याचे वचन देतात, पण पैसे देत नाहीत. “बरेच असे मोठे निर्माते आहेत जे तुमच्या पेमेंटच्या जवळजवळ ४०% पैसे देत नाहीत, पण ज्या लहान निर्मात्यांकडे बजेट नसते ते असं करत नाहीत. माझी अशा लहान निर्मात्यांबरोबर काम करण्यास काहीच हरकत नाही. माझे एकूण जवळपास २५ लाख रुपये बाकी आहेत, पण मला त्याचा काहीच फरक पडत नाही कारण देवाची कृपा आहे. मी २५ लाख रुपये एका रात्रीत आणि एका परफॉर्मन्समध्ये कमवू शकतो” असं अमाल म्हणाला.