Amitabh Bachchan Ayodhya Property : बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन मागील अनेक दशकांपासून इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. आपल्या करिअरमध्ये शेकडो सुपरहिट चित्रपट देणारे अमिताभ बच्चन एकेकाळी दिवाळखोर झाले होते, पण आता त्यांच्याकडे हजारो कोटींची संपत्ती आहे. त्यांनी आतापर्यंत मुंबईत अनेक मालमत्ता खरेदी केल्या आहेत. मागील वर्षापासून ते रामजन्मभूमी अयोध्या येथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत.
अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत आधीच तीन भूखंड खरेदी केले होते आणि आता त्यांनी चौथा भूखंड देखील खरेदी केला आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, अमिताभ यांनी २५,००० चौरस फूट भूखंड खरेदी केला आहे, ज्याची किंमत तब्बल ४० कोटी रुपये आहे.
अमिताभ बच्चन यांनी खरेदी केलेली भूखंड सरयू नावाच्या एका रिअल इस्टेट डेव्हलपमेंट एरियात आहे. इथेच बिग बींनी पूर्वीही गुंतवणूक केली होती. अमिताभ बच्चन यांनी अलीकडेच एका रिअल इस्टेट फर्ममध्ये प्रत्येकी १० कोटी रुपये गुंतवले होते. मिंटच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी राम मंदिर उद्घाटनापूर्वी त्यांनी अयोध्येत ५,३७२ चौरस फूट भूखंड खरेदी केला होता, ज्यासाठी त्यांनी ४.५४ कोटी रुपये मोजले होते.
सरयू रिअल इस्टेटमध्ये त्यांनी १४.५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तसेच त्यांनी शहरात ५४,००० चौरस फूटचा भूखंड देखील खरेदी केला, जो त्यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांच्या ट्रस्ट अंतर्गत नोंदणीकृत आहे. या जमिनीवर वडिलांचे स्मारक बांधण्याची बिग बी यांची योजना असल्याचं म्हटलं जात आहे.

बच्चन कुटुंबाची मालमत्ता
बच्चन कुटुंबीय मागील अनेक वर्षांपासून मालमत्तेत गुंतवणूक करत आहे, २०२४ मध्ये अमिताभ बच्चन यांनी मुलगा अभिषेक बच्चनबरोबर २५ कोटी रुपयांचे १० अपार्टमेंट खरेदी केले. अभिनेत्री व राज्यसभा सदस्य जया बच्चन यांनी त्यांची एकूण मालमत्ता जाहीर केली होती. निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या आणि अमिताभ बच्चन यांच्याकडे १,५७८ कोटी रुपयांची संयुक्त मालमत्ता आहे. त्यांच्याकडे जंगम मालमत्ता ८४९.११ कोटी रुपयांची आहे आणि स्थावर मालमत्ता ७२९.७७ कोटी रुपयांची आहे.
अमिताभ बच्चन यांनी नुकतंच मुंबईतील अंधेरी भागात ८३ कोटी रुपयांमध्ये एक मालमत्ता विकली. ती त्यांनी २०२१ मध्ये ३१ कोटी रुपयांमध्ये खरेदी केली होती. अमिताभ बच्चन यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोताबद्दल बोलायचं झाल्यास ते चित्रपट, जाहिराती व कौन बनेगा करोडपती होस्ट करून कमाई करतात.