बॉलीवूडमधील लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक म्हणजे नव्या नवेली नंदा. अमिताभ बच्चन यांची नात मनोरंजन सृष्टीपासून दूर असली तरीही तिचा चाहतावर्ग मोठा आहे. ती काय करते हे जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. नव्याच्या नम्रपणाचं आणि तिच्या कामाचं अनेकदा कौतुक केलं जातं. आता पुन्हा एका तिच्या व्हायरल व्हिडीओमुळे सर्वांचं लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं आहे.

नव्याला मनोरंजन सृष्टीत काम करायचं नाही. तर तिने स्वतःचं स्टार्टअप सुरू केलं असून त्या माध्यमातून तिला समाजकार्य करायचं आहे. महिला शिक्षण, महिला सबलीकरण यासाठी ती काम करते. आता तिने नुकतीच एक मुलाखत दिली आणि त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नव्याचे विचार ऐकल्यावर आणि विशेषकरून तिचं हिंदी ऐकल्यावर सर्वजण अवाक् झाले आहेत.

आणखी वाचा : “सारखा सारखा एकच ड्रेस परिधान करतेस…,” ट्रोलरच्या कमेंटला बिग बींच्या नातीने दिलं चोख उत्तर; नव्या म्हणाली…

सुप्रिया पॉलला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “तुझं वय कमी आहे, तुला अनुभव नाही या गोष्टी मी सतत ऐकत असते. त्यामुळे अनेकदा असा प्रश्न उपस्थित केला जातो की वयाच्या २५ व्या वर्षी तू कसं काय वैद्यकीय किंवा कायदेविषयक समस्या, घरगुती हिंसा यांसारख्या समस्यांवर काम करू शकतेस? पण मी असा विचार करते की जर मी ८० वर्षापर्यंत हे सगळं करायचं थांबले तर जगाचं काय होईल! आपल्या देशातील लोकसंख्येपैकी २५ ते ३० वयोगटातील तरुणांची संख्या अधिक आहे. जर आपण सगळेच वयाच्या पन्नाशीपर्यंत काही करण्यासाठी वाट बघत बसलो तर या नवीन पिढीचं काय होईल? बदल कोण घडवेल? आपल्या देशाच्या नवीन पिढीला कमी वयात खूप ज्ञान आहे. त्यांना कमी लेखायला नको, कारण आपण आज खूप सक्षम आहोत.”

हेही वाचा : बिग बींच्या नातीची खवय्येगिरी; रस्त्याच्या कडेला चाट-पापडीचा आस्वाद घेताना दिसली नव्या, फोटो चर्चेत

या व्हिडीओमध्ये नव्या अत्यंत शुद्ध हिंदीमध्ये तिचं मत मांडताना दिसत आहे. त्याचबरोबर तिचे विचार अत्यंत कौतुकास्पद आणि स्पष्ट आहेत. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी तिचं कौतुक करू लागले आहेत. एकाने लिहिलं, “नव्या खूप हुशार आहे.” तर दुसरा म्हणाला, “कोणीतरी बॉलीवूडमधून असं आहे ज्याला खरोखरच ज्ञान आहे.” तर आणखी एकाने लिहिलं, “ही एकमेव बुद्धिमान स्टारकिड आहे.” तर आणखी एक जण म्हणाला, “खूप छान! जर असा विचार नवीन पिढीची मुलगी करू शकते तर येणाऱ्या गळ्यात नक्कीच काहीतरी चांगलं घडेल.”