Rekha Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन व रेखा यांचं एकेकाळी अफेअर होतं, त्यांच्या प्रेम कहाणीची चर्चा आजही होत असते. या दोघांची जवळीक ‘दो अनजाने’च्या सेटवर वाढली होती, असं म्हटलं जातं. त्यावेळी अमिताभ बच्चन यांचं जया भादुरी यांच्याशी लग्न झालं होतं. खरं तर जया व अमिताभ बच्चन यांनी लग्नानंतर रेखाबरोबर एक सिनेमा केला होता. हा अमिताभ व रेखा यांनी एकत्र काम केलेला शेवटचा सिनेमा होय.

‘सिलसिला’ नंतर अमिताभ बच्चनबरोबर काम न केल्याने नुकसान झाले अशी कबुली रेखा यांनी स्वतः दिली होती. फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत रेखा यांनी बिग बींसह काम न करण्याच्या निर्णयावर विचार केला आणि त्याला नुकसान म्हटलं होतं. “एक कलाकार म्हणून मला अमितजींच्या अद्भुत प्रगतीचा एक भाग होता आलं नाही, हे माझं सर्वात मोठं नुकसान आहे. मला फक्त एकच तार्किक उत्तर सुचतंय ते म्हणजे अमितजींबरोबर काम करण्याची वाट पाहणं, कारण प्रत्येक गोष्ट योग्य वेळी योग्य कारणासाठी घडते,” असं रेखा म्हणाल्या होत्या.

अमिताभ बच्चन रेखाला शेवटचं काय म्हणाले होते?

एकदा स्टारडस्टला दिलेल्या मुलाखतीत रेखा म्हणाल्या होत्या की इंडस्ट्रीतील त्यांच्या मित्रांनी त्यांना सांगितलं की अमिताभ बच्चन आता त्यांच्याबरोबर काम करणार नाहीत. “मुकद्दर का सिकंदरच्या ट्रायल शोनंतर एका आठवड्यानंतर, इंडस्ट्रीतील सर्वजण मला सांगत होते की त्यांनी (अमिताभ बच्चन) निर्मात्यांना स्पष्ट सांगितलंय की ते माझ्याबरोबर काम करणार नाहीत. इतर सर्वांनी मला हे सांगितलं, पण ते स्वतः या विषयावर एकही शब्द बोलले नाहीत. जेव्हा मी याबद्दल त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते म्हणाले, ‘मी एक शब्दही बोलणार नाही. मला त्याबद्दल विचारू नकोस’,” असं रेखा म्हणाल्या होत्या.

rekha amitabh bachchan jaya bachchan
रेखा, अमिताभ बच्चन व जया बच्चन (फोटो- स्क्रीनशॉट)

‘सिलसिला’मध्ये रेखा व अमिताभ बच्चन यांनी एकत्र केलेलं काम

सुरुवातीला जया बच्चन यांना ‘सिलसिला’ चित्रपटात काम करण्यास रस नव्हता अशा बातम्या आल्या होत्या. यश चोप्रांसाठी त्या तिघांना एकत्र आणणं खरोखर कठीण होतं. पण चित्रपटाच्या क्लायमॅक्समुळे जया यांनी या सिनेमासाठी होकार दिला. ‘सिलसिला’ची कथा रेखा, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्यातील ऑफस्क्रीन प्रेम त्रिकोणाभोवती फिरते. रेखा व बच्चन यांनी एकत्र काम केलेला हा शेवटचा सिनेमा होय. त्या चित्रपटानंतर दोघांनी कधीही स्क्रीन शेअर केली नाही.

रेखा व जया अनेकदा इव्हेंट्समध्ये भेटत असतात. रेखा बरेचदा अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, आराध्या यांनाही भेटतात, प्रेमाने त्यांची विचारपूस करत असतात. मात्र आजवर कधीच अमिताभ बच्चन व रेखा यांना एका फ्रेममध्ये पाहायची संधी चाहत्यांना मिळालेली नाही.