Amitabh Bachchan Recalls Old Memory Of Parents : छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती’ हा लोकप्रिय कार्यक्रम नुकताच सुरू झाला आहे. ‘कौन बनेगा करोडपती’च्या नव्या पर्वामधून महानायक अमिताभ बच्चन होस्ट म्हणून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या कार्यक्रमामुळे अनेक प्रेक्षकांच्या ज्ञानात भर पडते. तसेच या शोमध्ये स्पर्धकांशी बोलताना बिग बी आपल्या आयुष्यातील काही खास आठवणीही शेअर करतात. अशातच बिग बींनी त्यांच्या लहानपणीची एक आठवण सांगितली.

शोच्या नुकत्याच झालेल्या भागात एक स्पर्धक आपल्या आईबरोबर आला होता. यावेळी त्यानं सांगितलं की, त्याचे वडील रोजंदारीवर काम करतात आणि हा शो जिंकून तो मोठं घर घेऊ इच्छितो. यानंतर बिग बींनी स्पर्धकाला आईवडिलांविषयीची जुनी आठवण विचारली. तेव्हा त्या स्पर्धकाने सांगितलं की, मागच्यावर्षी त्याने आईवडिलांना एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला नेलं आणि त्यांना सांगितलं की, “किंमती पाहू नका, हवं ते ऑर्डर करा.”

हे ऐकताच अमिताभ बच्चन यांनीही स्वतःची एक आठवण सांगितली. ते म्हणाले, “तुमच्यासमोर बसलेला हा माणूसही एकेकाळी पहिल्यांदाच रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेला होता. दिल्लीमधील ‘मोती महल’ हे खूप प्रसिद्ध आणि महागडं हॉटेल आहे. मी कॉलेज पूर्ण केल्यानंतर, थोडेफार पैसे कमवायला लागलो होतो. तेव्हा मी माझ्या आई-वडिलांना तिथे घेऊन गेलो होतो. मी आजही तो दिवस विसरू शकत नाही.”

त्यानंतर ते सांगतात, “पैसे कमवायला लागल्यानंतर मी त्यांना तिथं घेऊन गेलो; पण तेव्हा माझ्या मनात खूप भीती होती. हे इतकं मोठं हॉटेल आहे, श्रीमंत लोकच इथे येतात. आपल्यासारखे सामान्य लोक दिसत नाहीयत. आपण गेलो, तर लोक आपल्याकडे कसे पाहतील? आपले कपडे कसे दिसतील? कोण काय बोलेल? असे एक ना अनेक विचार माझ्या डोक्यात चालू होते. त्यामुळे तुझी भावना मी पूर्णपणे समजू शकतो.”

त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी आई-वडिलांची आणखी एक आठवण सांगितली. ती आठवण म्हणजे, ‘कभी कभी’ चित्रपटाच्या श्रीनगरमधील शूटिंगदरम्यान त्यांच्या कुटुंबातील सगळे सेटवर होते. तेव्हा यश चोप्रा यांनी माझ्या आई-वडिलांनाही त्या सीनमध्ये बसायला सांगितलं आणि त्यामुळे ते त्या सीनमध्ये शशी कपूरच्या आई-वडिलांच्या भूमिकेत दिसले होते.