नाना पाटेकर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकरत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. वेगवेगळ्या विषयांवर आधारित हिंदी व मराठीतील चित्रपटांमध्ये काम करीत त्यांनी त्यांच्या अभिनयानं अनेकांना भुरळ घातली आहे. नाना पाटेकर यांच्या स्वभावाबद्दलचे अनेक किस्से ऐकण्यात आहेत. ते त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. अशातच प्रसिद्ध दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी नाना पाटेकरांबद्दलचा असाच एक किस्सा सांगितला आहे.
अमोल पालेकर यांनी एका मुलाखतीमध्ये याबाबत सांगितलं, “विधू विनोद चोप्रा यांच्याबरोबर झालेल्या वादानंतर नाना पाटेकरच्या तापट स्वभावामुळे मी माझ्या ‘थोडासा रुमानी हो जायें’ चित्रपटात त्याला काम न देण्याचा निर्णय घेतला होता.” १९८९ साली आलेल्या ‘परिंदा’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान नाना पाटेकर व विधू विनोद चोप्रा यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती. तेव्हापासून नाना पाटेकर यांच्या या स्वभावाबद्दल इंड्स्ट्रीत चर्चा केली जायची.
अमोल पालेकर नाना पाटेकरांबद्दल बोलताना पुढे म्हणाले, “पण त्यानं यासाठी माझ्याकडे अनेकदा विनवणी केली. त्यावेळी ‘परिंदा’ चित्रपट हिट झाला होता आणि त्यातील त्याचं पात्रही खूप गाजलं होतं. त्यामुळे एकूण त्याचा स्वभाव माझ्या चित्रपटातील पात्राशी मिळता-जुळता नव्हता; पण त्यानं ही भूमिका आव्हान म्हणून स्वीकारली. आणि त्यासाठी सलग १० दिवस तो माझ्याकडे येऊन तालीम करीत असे. त्यादरम्यान त्यानं स्वत:वर खूप काम केलं आणि त्या १० दिवसांत एकदाही आमच्यामध्ये कुठलाच वाद झाला नाही.”
दरम्यान, विधू विनोद चोप्रा यांनी नाना पाटेकरांबरोबर झालेल्या वादाबद्दल ‘सारेगमप’च्या सेटवर खुलासा केला होता. ते म्हणाले होते, “चित्रपटात नाना पाटेकरांचा एक असा सीन आहे ज्यामध्ये त्यांच्या पत्नीचं निधन झालेलं असतं आणि त्यामुळे नाना पाटेकरांनी मला विचारलं होतं की, इथे माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू असणं अपेक्षित आहे का आणि तेव्हा आम्ही सलग चित्रीकरणामध्ये व्यग्र होतो. तेव्हा तो आता मी थकलो आहे आणि त्यामुळे पुढे काम करू शकत नाही,असं म्हणाला. त्यावर मी म्हटलं की, ठीक आहे मग पुढे चित्रीकरणाचा जो काही खर्च असेल, तो तू दे. त्यानंतर तो माझ्यावर ओरडायला लागला मग मीही त्याला प्रतिउत्तर दिलं; पण त्यादरम्यान माझ्याकडून त्याचा कुर्ता फाटला. तेव्हा तिथे सेटवर उपस्थित असलेला पोलिस मला म्हणाले की, आम्ही तुमच्या सुरक्षेसाठी येथे आहोत आणि तुम्हीच स्वत: भांडत आहात.”