Amruta Subhash Talk’s About Gully Boy : अमृता सुभाष मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अलीकडेच ती तिच्या ‘जारण’ चित्रपटामुळे चर्चेत आली होती. तिने आजवर मराठीसह हिंदीतही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. नुकतेच तिने ‘गली बॉय’ चित्रपटाबद्दल सांगितले आहे.

अमृताने मराठी हिंदीतील चित्रपट, नाटक, वेब सीरिजमध्ये काम केले आहे. अशातच नुकतेच तिने ‘विषय खोल’शी संवाद साधताना ‘गली बॉय’ चित्रपटातील तिच्या भूमिकेबद्दल सांगितले आहे. यावेळी तिने दिवंगत दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांच्याबद्दलही सांगितले आहे.

अमुता सुभाषने जोया अख्तर दिग्दर्शित ‘गली बॉय’ चित्रपटात रणवीर सिंहच्या आईची म्हणजेच राजिया अहमद ही भूमिका साकारलेली. मुलाखतीत ती सुमित्रा भावेंबद्दल म्हणाली, “मी त्यांच्या चित्रपटात ‘चाकोर’मध्ये पहिल्यांदा काम केलं होतं. त्यांच्याकडून मला खूप शिकायला मिळालं. त्यांच्या अनेक चित्रपाटांत मी काम केलं आहे. त्यामुळे जेव्हा त्या माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शिका नव्हत्या तेव्हासुद्धा मी त्यांच्याकडून सल्ला घेतला होता.”

‘गली बॉय’मधील भूमिकेबद्दल अमृता सुभाष काय म्हणाली?

अमृता सुभाष ‘गली बॉय’बद्दल म्हणाली, “ज्या सिनेमाची ती दिग्दर्शिका नव्हती, त्याही सिनेमाच्या बाबतीत मी तिला विचारत राहिले. मला आठवतं की, मी ‘गली बॉय’ करत असताना तिला कॉल केलेला. मला कल्पना करवत नव्हतं की, दुसरी बाई घरात येत आहे आणि मला माझ्या खोलीतून माझे कपडे बाहेर आणावे लागत आहेत वगैरे. तेव्हा तिने मला एकच शब्द सांगितलेला, तो शब्द होता कारवादनं. ती म्हणालेली, की त्या बायका ना कारवादतात (खूप दु:खात असतात) ती ज्या सिनेमाची दिग्दर्शिका नव्हती तेव्हाही ती माझ्यासाठी होती. मी तिच्यावर खूप अवलंबून होते.”

‘गली बॉय’मध्ये अमृताने रणवीर सिंहच्या आईची राजिया अहमदची भूमिका साकरली होती. त्यामध्ये त्याचे वडील दुसरे लग्न करतात, असे पाहायला मिळते. त्यावेळी त्या चित्रपटाची प्रचंड क्रेझ होती आणि बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता.

दरम्यान, अमृता सुभाषच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ती नुकत्याच आलेल्या ‘जारण’ चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली होती. त्यामधील तिच्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक केले. त्याशिवाय प्रेक्षकांचाही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले.