लोकप्रिय गायिका अनन्या बिर्लाने संगीत क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या सुपरहिट इंग्रजी गाण्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गायिकेनं आता गाणी गाणार नसल्याचं म्हटलं आहे. ‘होल्ड ऑन’ आणि ‘लिविन द लाइफ’ या सारख्या सुप्रसिद्ध गाण्यांना आवाज देणारी अनन्या आता संगीत क्षेत्र सोडत आहे, तिने सोशल मीडियावर हे क्षेत्र सोडण्याबद्दल पोस्ट शेअर केली आहे.
अनन्या ही आदित्य बिर्ला ग्रुपचे प्रमुख कुमार मंगलम बिर्ला यांची मुलगी आहे. २९ वर्षीय अनन्याने आजवर एकापेक्षा एक सुमधूर गाणी गायली आहे. सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेली अनन्या हिने यापुढे गाणी गाणार नसल्याचं जाहीर केलं आहे. तिने हा निर्णय का घेतला, याचं कारणही तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सांगितलं आहे. अनन्याने गायन सोडण्याचा निर्णय जाहीर केल्याव तिचे चाहते नाराज झाले आहेत.
अनन्या बिर्लाची पोस्ट
अनन्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक लांबलचक पोस्ट शेअर करून तिच्या निर्णयाची घोषणा केली आहे. “मित्रांनो, हा सर्वात कठीण निर्णय होता. मी अशा लेव्हलला पोहोचले आहे जिथे माझा व्यवसाय आणि संगीत या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सांभाळणं जवळजवळ अशक्य झाल आहे आणि त्याचा माझ्यावर अशा प्रकारे परिणाम होत आहे की मी सांगू शकत नाही. तुमच्या प्रेमाबद्दल सर्वांचे आभार,” असं अनन्याने लिहिलं आहे.
पुढे ती म्हणाली, “गेल्या काही वर्षांत मी जे संगीत प्रसिद्ध केलंय, त्यामुळे मला आशा आहे की एक दिवस आपण आपल्याच लोकांनी बनवलेल्या इंग्रजी गाण्यांचे कौतुक करू शकू कारण आपल्या देशात खूप प्रतिभावान लोक आहेत. पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद. आता माझी सर्व ऊर्जा व्यवसायात केंद्रित करायची वेळ आली आहे.”
अनन्या बिर्लाचा व्यवसाय
अनन्या बिर्ला इंडिपेंडेंट मायक्रोफायनान्सची संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. तिची कंपनी ग्रामीण भारतातील कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना आणि महिला व्यावसायिकांना आर्थिक मदत करते. याशिवाय अनन्या ही क्यूरोकार्टे या लक्झरी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची संस्थापक आहे जी जगभरातील हस्तकला प्रोजेक्ट्सची विक्री करते.
अनन्या बिर्लाचं शिक्षण
अनन्या बिर्लाने आपले सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे इथून पूर्ण केले. त्यानंतर तिने ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातून इकॉनॉमी आणि मॅनेजमेंटमध्ये पदवीचं शिक्षण घेतलं. उत्तम गायिका व बिझनेसवूमन असण्याबरोबरच अनन्या वकीलही आहे.