Jr NTR on comparisons with Hrithik Roshan: हृतिक रोशन व ज्युनिअर एनटीआर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘वॉर २’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने धुमाकूळ घातला आहे.
हृतिक रोशन व ज्युनिअर एनटीआर यांचा जबरदस्त लूक, अॅक्शन आणि चित्रपटातील गाणी यांमुळे चित्रपटाची मोठी चर्चा होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन यांनी ‘वॉर २’ चित्रपटांतील गाण्यावर डान्स केला होता. तो डान्स व्हिडीओदेखील व्हायरल झाला होता.
१४ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याआधी ग्रँड प्रीमिअर हैद्राबादमध्ये पार पडला. या सोहळ्यात ज्युनिअर एनटीआरने, हृतिकने एकत्र काम करताना सांभाळून घेतले, चांगली वागणूक दिली याबद्दल त्याचे कौतुक केले. हृतिकनेदेखील जमलेल्या गर्दीला उद्देशून बोलताना ज्युनिअर एनटीआरचे कौतुक केले. तसेच त्याला एक भाऊ मिळाला असेही तो म्हणाला.
ज्युनिअर एनटीआरचा संताप अनावर
आता ज्युनिअर एनटीआरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ हैद्राबादमधील सोहळ्यादरम्यानचा आहे. यामध्ये ज्युनिअर एनटीआर रागात दिसत आहे. जेव्हा अभिनेत्याने बोलण्यासाठी माइक हातात घेतला, त्यावेळी प्रेक्षकांचा गोंधळ सुरू होता. त्यावेळी गर्दीतील एका चाहत्याकडे बोट करून ज्युनिअर एनटीआर म्हणाला, “मी इथून जाऊ का? मी आता काय म्हणालो? माइक खाली ठेऊन स्टेज सोडून जाण्यासाठी मला एक मिनिटही लागणार नाही. मी बोलू का? कृपया शांतता राखा”, असे म्हणत त्याने चाहत्यांना शांत राहण्यास सांगितले.
“तुझ्याबरोबर ७५ दिवस काम करताना मी खूप…”
पुढे ज्युनिअर एनटीआर हृतिक रोशनचे कौतुक करत म्हणाला, “तुझ्याबरोबर ७५ दिवस काम करताना मी खूप काही शिकलो आहे. तुझ्याबरोबर पुन्हा काम कऱण्यास मी उत्सुक आहे. मला तुझा भाऊ समजण्यासाठी, तशी वागणूक देण्यासाठी आणि खुल्या मनाने मला स्वीकारण्यासाठी, माझे स्वागत करण्यासाठी थँक्यू. मी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आहे. राजमौली सरांनी त्यांच्या चित्रपटांतून दक्षिण आणि उत्तरेतील सीमारेषा पुसल्या आहेत. पण, तरीही दाक्षिणात्य कलाकारांना एक शंका असते की त्यांना उत्तरेत स्वीकारले जाईल की नाही. पण, मला इतक्या छान पद्धतीने स्वीकारल्याबद्दल आणि पहिल्या दिवशी मिठी मारून स्वागत केल्याबद्दल मी आभारी आहे. ‘वॉर २’चे शूटिंग करतानाचे तुझ्याबरोबरचे हे क्षण मी कधीच विसरणार नाही. जेव्हा आपला चित्रपट प्रदर्शित होईल, त्यावेळी आपला बॉण्ड अजून चांगला होईल.”
ज्युनिअर एनटीआर असेही म्हणाला, “येथे असलेला माझा प्रत्येक चाहता आणि जे चाहते नाही, तेसुद्धा तुमची काळजी घेतील हे माझे वचन आहे. ते तुम्हाला त्यांच्या हृदयात ठेवतील; ती जबाबदारी आमची आहे.”
‘जनाब-ए-आली’ गाण्यातील हृतिक आणि ज्युनिअर एनटीआर यांची मोठी तुलना झाली. याबद्दल अभिनेता म्हणाला की, अशा तुलना चाहत्यांची दिशाभूल करू शकतात. आम्ही दोघेही चांगले डान्सर आहोत. आम्ही एकमेकांना पूरक होतो. या डान्सचा प्रेक्षकांनी आनंद घ्यावा, अशी माझी इच्छा आहे. हृतिक रोशन हा देशातील सर्वोत्तम डान्सरपैकी आहे.
“गेल्या २५ वर्षांपासून…”
हृतिक रोशन ज्युनिअर एनटीआरबद्दल म्हणाला, “मी फक्त तुला पाहिले नाही, तर तुझ्याकडून शिकलो आहे. मी स्वतःला तुझ्यामध्ये पाहतो. गेल्या २५ वर्षांपासून आमचा प्रवास सारखाच आहे. तो त्याच्या कामाप्रति अत्यंत समर्पित आहे. तो एका टेकमध्ये सीनचे शूटिंग पूर्ण करतो. विशेष म्हणजे एकदा एखाद्या सीनचे शूट केले, तर तो शॉट पुन्हा बघतही नाही.
‘वॉर २’ हा ज्युनियर एनटीआरचा बॉलीवूडमधील पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीने केले आहे. या चित्रपटात कियारा अडवाणी देखील मुख्य भूमिकेत आहे. आता या चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.