Anurag Kashyap on Mental Health: दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्या चित्रपटांचे जगभरात अनेक चाहते आहेत. अनुराग हा त्याच्या एका हटके स्टाईलच्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. नुकतेच त्याने एका मुलाखतीत मुंबई सोडण्याबद्दल भाष्य केले आहे.
हिंदी चित्रपटसृष्टी बॉक्स ऑफिसच्या मागे धावत असून चित्रपटांचा दर्जा घसरत चाललेला आहे, हे पाहून नैराश्यात गेल्याने मुंबईतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे अनुराग कश्यपने सांगितले. दक्षिणेत गेल्यापासून दारू सोडल्याचेही त्याने सांगितले. अनुराग कश्यप जितका त्याच्या चित्रपटांसाठी ओळखला जातो, तितकाच तो त्याच्या स्पष्टवक्तपणेसाठीदेखील ओळखला जातो.
अनुराग कश्यप काय म्हणाला?
सुधीर श्रीवासन यांच्या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अनुराग म्हणाला, “मी नौराश्यात गेले होतो आणि आता मी त्यामधून बाहेर आलो आहे. आता आनंदात आयुष्य जगत आहे. एक गोष्ट मी केली, ती म्हणजे मी हिंदी चित्रपट पाहणे बंद केले. मी भरपूर मल्याळम चित्रपट पाहायला सुरूवात केली.”
“हिंदी चित्रपट निर्माते मला टाळत आहेत, कारण त्यांना वाटते की मी त्यांच्यासाठी वाईट आहे. कारण मी स्पष्टवक्ता आहे. त्यांना वाटते की जर त्यांनी माझ्याशी संबंध ठेवले तर कदाचित त्यांना एखाद्या स्टुडिओबरोबर काम करता येणार नाही किंवा इतर कोणीतरी नाराज होईल. मी अशा ठिकाणी आलो आहे, जिथे माझ्यावर लोक खूप प्रेम करतात. माझ्या कामाला मला दक्षिणेत खूप प्रेम मिळतं. हे पाहिल्यानंतर इतके दिवस मी मुंबईत काय करत होतो, असा प्रश्नही मला पडला.”
अनुराग कश्यप पुढे म्हणाला, “माझ्या मनात आले की अशा ठिकाणी का आहे, जिथे मला सांगितलं जातं की लोक तुझ्या दारूच्या व्यसनाबद्दल बोलत आहेत, लोक तुझ्या नैराश्याबद्दल बोलत आहेत, लोक म्हणत आहेत की तू भरकटला आहेस. लोक माझे तारणहार बनण्याचा प्रयत्न करतात आणि मी मला स्वतःपासून वाचवण्यासाठी काय केले पाहिजे हे सांगतात,”
दक्षिणेत गेल्यापासून दारू पिणे बंद केल्याचा खुलासा अनुरागने केला. तो म्हणाला, “मी दररोज लोकांना भेटत नाही, त्यामुळे सहाजिकच मी व्यायाम करायला लागलो, मी लिहायला लागलो.”
यापूर्वीही अनुराग कश्यपने हिंदी चित्रपटसृष्टी ही पैशाच्या मागे धावत असल्याची टीका केली होती. तसेच पूर्वी बरोबर काम केलेले अभिनेते त्याच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे म्हटले होते. तसेच ‘मॅक्सिमम सिटी’ (Maximum City) ही वेब सीरिज नेटफ्लिक्ससाठी बनवत असताना ती अचानक बंद पडल्याने त्याला मानसिक समस्यांचा सामना करावा लागल्याचा खुलासा अनुराग कश्यपने केला होता. त्याचे इतरही अनेक चित्रपट अपूर्ण राहिले आहेत.
आगामी काळात अनुराग कश्यपचा ‘निशाणची’ (Nishaanchi) हा चित्रपट १९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. याबरोबरच त्याचे ‘बंदर’ आणि ‘केनेडी’ हे चित्रपटही पूर्ण झाले असून लवकरच ते प्रदर्शित होणार आहेत.