Anurag Kashyap On Casting Aaishvary Thackeray In Nishaanchi : अनुराग कश्यप बॉलीवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक आहे. लवकर त्याचा निशांची हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात बाळासाहेब ठाकरे यांचा नातू ऐश्वर्य ठाकरे झळकणार आहे. अशातच अनुरागने ऐश्वर्यबद्दल सांगितलं आहे.

अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘नीशांची’ हा सिनेमा १९ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ऐश्वर्य यामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. बॉलीवूड हंगामाच्या वृत्तानुसार अनुराग कश्यपने ऐश्वर्यची निवड करण्याबद्दल सांगितलं की, “ऐश्वर्यने मला त्याच्या आयुष्यातील ४ वर्षं दिली. मी कामाप्रती अशी निष्ठा असणाऱ्याच्या शोधात होतो.”

अनुराग पुढे म्हणाला, “मी अशा लोकांबरोबर काम करतो जे मला त्यांचा पूर्ण वेळ देतात आणि ऐश्वर्यनेही तेच केलं.” अनुराग कश्यपने नुकतच ‘हिंदुस्तान टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ‘नीशांची’ चित्रपटाबद्दल सांगितलेलं. तो म्हणालेला, “हा सिनेमा सलीम-जावेद यांच्या चित्रपटांसारखा आहे. यामध्ये नायक आहे, ड्रामा आहे. मी ६९ दिवस या चित्रपटासाठी काम केलं. पहिल्यांदाच मी इतका वेळ कुठल्या चित्रपटाचं शूटिंग केलं आहे”.

अनुरागने ‘नीशांची’ चित्रपटाच्या नावाबद्दलही सांगितलेलं. तो म्हणालेला, “सुरुवातील चित्रपटाचं नाव बबलू नीशांची, रंगिली रिंकू अँड डबलू असं होतं परंतु, सगळ्यांनी सांगितलं की हे खूप मोठं नाव आहे.”

निशांची चित्रपटात ऐश्वर्य ठाकरे डबल रोमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याच्याबरोबर यामध्ये वेदिका पिंटो, मोनिका पानवार, मोहम्मद जीशान आणि कुमुद मिश्रा हे कलाकार झळकणार आहेत. अजय राय आणि रांजन राय यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘नीशांची’ या चित्रपटाची पटकथा अनुराग कश्यपने लिहिली आहे.

दरम्यान, माध्यमांच्या वृत्तानुसार अनुराग कश्यपने या चित्रपटाबद्दल सांगितलेलं की, २०१६मध्ये या चित्रपटाची कथा लिहिली गेली होती तेव्हापासून तो हा चित्रपट बनवण्याचा विचार करत होता परंतु, त्यांना यासाठी कोणी पाठिंबा दिला नव्हता. अशातच आता ३१ जुलै रोजी या चित्रपटाचा पहिला पोस्टर समोर आलेला. आता अखेर हा चित्रपट येत्या १९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.