Anurag Kashyap Slams Vijay Subramaniam For Announcing Made In AI Film : लोकप्रिय बॉलीवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. अनेकदा तो इंडस्ट्रीसंबंधित गोष्टींबाबत स्पष्टपणे त्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करत असतो. अशातच आता अनुरागने नुकतीच एक पोस्ट शेअर करीत संताप व्यक्त केला आहे.
अनुराग अनेकदा सोशल मीडियामार्फत पोस्ट शेअर करीत त्याच्या प्रतिक्रिया, तसेच न पटलेल्या गोष्टीवर टीका करताना दिसतो. आता त्याने मंगळवारी (१९ ऑगस्ट) त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्याने कलेक्टिव्ह आर्टिस्ट नेटवर्कचे (Collective Artists Network) संथापक विजय सुब्रह्मण्यमबद्दल पोस्ट शेअर करीत टीका केली आहे. ही कंपनी दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, हृतिक रोशन व रश्मिका मंदाना यांसारख्या कलाकारांना सेवा प्रदान करते.
AIच्या साह्याने चित्रपट बनवणारे विजय सुब्रह्मण्यम यांची पोस्ट
विजय सुब्रह्मण्यम यांनी इन्स्टाग्रामवर नुकतीच पोस्ट शेअर केली होती. त्यामधून त्यांनी त्यांच्या’ चिरंजीवी हनुमान’ या चित्रपटाची घोषणा केली होती. हा एआयच्या (AI) साह्याने बनवण्यात आलेला चित्रपट असल्याचं त्यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी या पोस्टखाली कॅप्शनमधून म्हटलं, “मला सांगताना अभिमान वाटत आहे की, ‘चिरंजीवी हनुमान’ हा भारतातील पहिला मेड इन एआय, मेड इन इंडिया चित्रपट आहे. आपली संस्कृती, वारसा व इतिहास या गोष्टींना लक्षात ठेवून आम्ही जानेवारी २०२६ रोजी हनुमान जयंतीला हा सिनेमा चित्रपटगृहांत प्रदर्शित करीत आहोत. या पोस्टखाली अभिनेता रणवीर सिंहने कमेंट केली असल्याचंही पाहायला मिळतं.
अनुराग कश्यपने व्यक्त केला संताप
विजय सुब्रह्मण्यम यांनी ही पोस्ट शेअर केल्यानंतर अनुराग कश्यपने इन्स्टाग्रामवर त्यासंबंधित पोस्ट शेअर करीत विजय सुब्रह्मण्यमवर जोरदार टीका केली आहे. तो म्हणाला, “जी व्यक्ती, कलाकार, लेखक, दिग्दर्शक या सगळ्याचं प्रतिनिधित्व करते, तो आता एआयमार्फत चित्रपट बनवत आहे. अभिनंदन विजय सुब्रह्मण्यम.” अनुराग पुढे म्हणाला, “शेवटी या सर्व संस्था स्वत:च्या हितासाठी कलाकारांचा वापर करून पैसे कमावतात आणि कलाकारांकडून त्यांना त्यांच्या अपेक्षेनुसार नफा झाला नाही, तर ते थेट एआयकडे वळतात.”
अनुराग कश्यप याबाबत बोलताना पुढे म्हणाला, “जी व्यक्ती स्वत:ला कलाकार समजत असेल, तिने याबद्दल प्रश्न उपस्थित केला पाहिजे किंवा ही संस्था सोडली पाहिजे. कारण- त्यानं सिद्ध केलं आहे की, तुम्ही एआयशी तुलना करू शकत नाही. शाबास विजय सुब्रह्मण्यम! लाज वाटायला हवी; पण तेवढं पुरेसं नाही. तुमचं वागणं इतकं खालच्या पातळीवर गेलंय की, ते निंदनीय आहे.”
काही दिवसांपूर्वी एआयसंबंधित आणखी एक वाद निर्माण झाला होता. दाक्षिणात्य अभिनेता धनुष व सोनम कपूर यांच्या ‘रांझणा’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी तो पुन्हा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला. पण, यावेळी त्याचा शेवट एआयच्या साह्याने बदलण्यात आलेला. त्याला अनेक कलाकारांनी विरोध केला.