Arshad Warsi Recalls Mother’s Memory : कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा आधार म्हणजे आई-वडील. लहानपणापासूनच प्रत्येकाला त्याचे आई-वडील प्रिय असतात. त्यामुळेच ते आयुष्यभर आपल्याबरोबर राहावेत, असं वाटत असतं. मात्र, काहींच्या नशिबात हे सुख नसतं. असाच एक अभिनेता आहे, ज्याचं आईचं छत्र लहानपणीच हरपलं आणि त्या दु:खातून तो अजूनही सावरलेला नाही.

बॉलीवूड अभिनेता अर्शद वारसीनं आजवर अनेक सिनेमांमधून आपल्या विनोदी अभिनयानं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. पण, या हसऱ्या चेहऱ्यामागे एक दु:ख होतं आणि ते दु:ख म्हणजे आई नसण्याचं. वयाच्या १४ व्या वर्षीच अरशदनं त्याच्या आई-वडिलांना गमावलं. त्यामुळे अभिनेत्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. आई-वडील नसल्यानं अरशदला लहानपणापासूनच संघर्ष करावा लागला.

अर्शद वारसी आई-वडिलांच्या आठवणीतही अनेकदा भावूक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अभिनेत्यानं राज शमानी यांच्या पॉडकास्टवर आयुष्यातील कठीण काळाबद्दल भावना व्यक्त केल्या होत्या. त्यामध्ये त्यानं आईबद्दलची शेवटची वेदनादायी आठवण सांगितली. डॉक्टरांनी आईला पाणी देऊ नये, असं सांगितलं होतं. डॉक्टरांच्या सल्ल्यामुळेच त्यानं आईला पाणी दिलं नाही, ज्याचा अभिनेत्याला आजही त्रास होतो.

ही आठवण सांगताना अर्शद म्हणालेला, “बाबांच्या निधनानंतर आईला किडनी फेल्युअर झालं होतं आणि ती डायलिसीसवर होती. ती साधी गृहिणी होती; पण अप्रतिम स्वयंपाक करायची. डॉक्टरांनी तिला पाणी देऊ नका, असं सांगितलं होतं. ती तिच्या शेवटच्या क्षणी पाणी मागत राहिली; पण मी देऊ शकलो नाही. निधनाच्या रात्री तिनं मला बोलावलं आणि माझ्याकडे पाणी मागितलं होतं आणि मी ते दिलं नाही. त्या रात्रीच ती गेली.”

अर्शद वारसी इन्स्टाग्राम पोस्ट

पुढे अर्शद म्हणाला, “आईच्या निधनानंतर मी अक्षरश: आतून तुटलोच. कधी कधी मला वाटतं की, जर मी तिला पाणी दिलं असतं आणि त्यानंतर ती गेली असती, तर आयुष्यभर मी स्वतःला दोष दिला असता. पण आता विचार केला, तर असं वाटतं की, मला तिला पाणी द्यायला हवं होतं. पण तेव्हा मी लहान होतो. तेव्हा मी डॉक्टरांचं ऐकलं. पण, आता वाटतं की, आपण रुग्णाचंही ऐकायला हवं. आपण आपल्याला अपराधी वाटू नये म्हणून निर्णय घेतो; पण जो आजारी असतो, त्याच्या मनाचा विचार फार कमी करतो. त्यामुळे कदाचित तेव्हा मी माझ्याऐवजी तिचा विचार केला असता आणि पाणी दिलं असतं तर… असं आता अनेकदा वाटतं.”