बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतम आपल्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. आत्तापर्यंत तिने वेगवेगळ्या ढंगाच्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या यामी तिच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. २३ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुक्ता निर्माण झाली होती. सुरुवातीला प्रेक्षकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत होता. मात्र, हळूहळू या चित्रपटाच्या कमाईत घट होताना दिसून येत आहे. दरम्यान या चित्रपटाच्या चौथ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘आर्टिकल ३७०’ने पहिल्याच दिवशी ५.९ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाल्याचे बघायला मिळाले. चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ७.४ कोटी व तिसऱ्या दिवशी ९.६ कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र, चौथ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घट झाल्याचे दिसून आले. चौथ्या दिवशी चित्रपटाने केवळ ३.२५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. चार दिवसांमध्ये या चित्रपटाने भारतात २६.१५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. जगभरात या चित्रपटाने ३४ कोटींचा गल्ला जमविला आहे.

आखाती देशांमध्ये चित्रपटावर बंदी

यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’वर आखाती देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. या बंदीचे कारण अद्याप समोर आले नसून, प्रमाणन मंडळानेही याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. आखाती देशांमध्ये बंदी घालण्यात आलेला ‘आर्टिकल ३७०’ पहिला भारतीय चित्रपट नाही. याअगोदर हृतिक रोशनच्या ‘फायटर’ व सलमान खानच्या ‘टायगर ३’ या चित्रपटांवरही आखाती देशांमध्ये बंदी घालण्यात आली होती.

हेही वाचा- “मी जेव्हा ते पात्र साकारलं…”, ‘अ‍ॅनिमल’मधील नकारात्मक पात्राबद्दल बॉबी देओल स्पष्टच बोलला

‘आर्टिकल ३७०’चे दिग्दर्शन आदित्य सुहास जांभळेने केले असून, या चित्रपटात यामी गौतमसह प्रियमणी, अरुण गोविल व किरण करमरकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटात यामीने एका एनआयए अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. केंद्र सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले आणि या राज्याचे जम्मू, काश्मीर व लडाख या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले. चित्रपटात ‘३७० कलम’ हटविण्यामागचा संघर्ष, काश्मीरचा इतिहास, आतंकवादाची पार्श्वभूमी, राजकीय हस्तक्षेप यांवर भाष्य करण्यात आले आहे.