Asha Bhosale Complained About Elder Sister Lata Mangeshkar : आशा भोसले हे म्युझिक इंडस्ट्रीतील मोठं नाव. त्यांनी त्यांच्या सुमधुर आवाजानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आशा भोसले यांच्या घरातच गायनाची पार्श्वभूमी असल्याने त्यांनी वयाच्या अवघ्या १० व्या वर्षी पहिलं गाणं गायलेलं. त्यांची मोठी बहीण दिवंगत गायिका लता मंगेशकर यांच्याप्रमाणे त्यांनीही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. परंतु, एकदा त्यांनी त्यांच्या बहिणीसंदर्भात तक्रार केली होती.
आशा भोसले यांनी ‘चला चला नव बाला’ नावाच्या पहिल्या मराठी गाण्यापासून कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी आजवर एकून ११ हजारहून अधिक गाणी गायली आहेत. त्यामध्ये अनेक प्रकारच्या गाण्यांचा समावेश आहे. परंतु, एकदा त्यांनी संगीतकार आर. डी. बर्मन यांच्याकडे एक तक्रार केलेली.
आशा भोसले यांनी आजवर गायली आहेत ११ हजारहून अधिक गाणी
आशा भोसले यांनी फक्त भारतीय नाही, तर पाश्चिमात्य प्रभाव असलेली गाणीदेखील गायली आहेत. ‘जनसत्ता’च्या वृत्तानुसार १९६६ मध्ये त्यांनी ‘तिसरी मंजिल’ चित्रपटातील ‘आजा आजा मैं हू प्यार तेरा’ हे गाणं गायलेलं. हे गाणं तसं खूप कठीण होतं. त्यामुळे आशा यांनी त्यासाठी खूप मेहनत घेतली. त्या या गाण्याकरिता १० दिवस रियाज करीत होत्या. त्यांना वाटलेलं की, त्या हे गाणं नाही गाऊ शकणार नाहीत; पण आर. डी. बर्मन यांनी ऐकलं नाही आणि ते त्यांच्याकडून या गाण्यासाठी रियाज करून घेत राहिले.
अनु कपूर यांनी याबद्दल एका रेडिओ शोमध्ये सांगितलेलं. ते म्हणालेले की, खूप मेहनत घेतल्यानंतर त्यांनी जेव्हा हे गाणं गायलं तेव्हा आर. डी. बर्मन खूप आनंदी झाले आणि त्यांनी बक्षीस म्हणून आशा यांना १०० रुपये दिले होते. परंतु, आशा यांनी त्यावेळी त्यांच्या मनात असलेली खंत आर. डी. बर्मन यांच्याकडे बोलून दाखवली.
आशा भोसले यांनी केलेली तक्रार
आशा यांनी आर. डी. बर्मन यांच्याकडे तक्रार करीत सांगितलं, “तुम्ही सगळी चांगली गाणी लतादीदीला देता आणि कठीण गाणी जी कोणी गाऊ शकत नाही अशी गाणी मला देता.” त्यावेळी आर. डी. बर्मन यांनी सांगितलेलं की, तू सगळ्या प्रकारची गाणी गाऊ शकतेस. त्यामुळेच मी अशी गाणी बनवू शकतो. जर तू गायली नाहीस, तर मला तितकी कठीण गाणी बनवता येणार नाहीत. आशा भोसले यांनी त्यानंतरसुद्धा आर. डी. बर्मन यांच्याबरोबर अनेक कठीण गाणी गायली.
आशा भोसले व आर.डी. बर्मन यांच्या लग्नाला झालेला विरोध
आशा भोसले आणि आर. डी. बर्मन यांना पाश्चिमात्य संगीताची खूप आवड होती. त्यांनी एकत्र खूप काम केलं होतं. त्याचदरम्यान त्यांच्यामध्ये प्रेम फुललं. आर. डी. बर्मन व आशा भोसले यांच्या लग्नाला आर. डी. बर्मन यांच्या आईचा विरोध होता. परंतु, नंतर जेव्हा त्यांच्या आईची प्रकृती खूपच खराब होत गेली तेव्हा ते पाहून आर. डी. बर्मन यांनी आशा यांच्याबरोबर लग्न केलं.