अलीकडच्या काळात फक्त बॉलीवूडमधील लग्नांमध्येच सुप्रसिद्ध गायक परफॉर्म करतात असं नाही, तर श्रीमंत लोकही गायकांना लग्नांच्या कार्यक्रमासाठी बोलावतात. लग्नांमध्ये गाणी गाण्यासाठी लोकप्रिय गायकांना पैसे देऊन बोलावलं जातं. काही लग्नांमध्ये तर सेलिब्रिटींनाही आमंत्रित केलं जातं. यासाठी या सेलिब्रिटी व गायकांना लाखो, करोडो रुपये मानधन दिलं जातं.

गेल्या वर्षी अनंत अंबानी व राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंग व लग्नात रिहाना, जस्टिन बीबरसारखे आंतरराष्ट्रीय पॉप स्टार आले होते. तसेच मिका सिंग, राहुल वैद्य व इतर अनेक गायकांनी या लग्नात परफॉर्म केलं होतं. सेलिब्रिटींना लग्नात नाचणं आणि गायकांनी गाणी सादर करणं नवीन राहिलं नाही. पण एकदा आशा भोसले यांनी लतादीदींबद्दल एक किस्सा सांगितला होता.

लता मंगेशकर यांनी नाकारली होती लाखो डॉलर्सची ऑफर

भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर यांना लग्नात गाण्यासाठी लाखो डॉलर्सची ऑफर देण्यात आली होती, पण त्यांनी नकार दिला होता. आशा भोसले यांनी याबाबत खुलासा केला होता. ‘डीआयडी लिटील मास्टर्स ५’ या डान्स रिॲलिटी शोमध्ये आशा यांनी लतादीदींना आलेल्या ऑफरबद्दल सांगितलं होतं. “त्यांना (लता मंगेशकर यांना) एका लग्नात गाण्यासाठी एक मिलियन डॉलर्सची ऑफर देण्यात आली होती. ‘तुमचे फक्त दोन तास द्या आणि या आणि लग्नाला उपस्थित राहा’ पण लतादीदींनी उत्तर दिलं होतं, ‘तुम्ही मला ५० लाख डॉलर्स दिले तरी मी येणार नाही,” असं आशा भोसले म्हणाल्या होत्या.

लग्नात गाण्यास दिलेला नकार

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळ्यात आशा भोसले यांनी असाच एक किस्सा सांगितला होता. “आम्हाला कोणीतरी लग्नासाठी बोलावलं होतं. त्यांच्याकडे दशलक्ष डॉलर्स किंवा पौंड किमतीची तिकिटं होती. त्यांना आशा भोसले आणि लता मंगेशकर हव्या आहेत, असं त्यांनी सांगितलं. दीदींनी मला विचारलं, ‘तू लग्नात गाणार का?’ मी म्हणाले, मी गाणार नाही, आणि दीदींना त्या प्रतिनिधीला सांगितलं, ‘तुम्ही १० कोटी डॉलर्स दिले तरी आम्ही गाणार नाही, कारण आम्ही लग्नात गात नाही.’ हे एकून ती व्यक्ती खूप निराश झाली होती,” असं आशा भोसले म्हणाल्या होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लता मंगेशकर व आशा भोसले यांनी असंख्य गाणी गायली. पण त्यांनी कधीच लग्नांमध्ये सादरीकरण केले नाही.