Asha Parekh shares photo with Waheeda Rehman and Helen: ‘आंदोलन’, ‘भाग्यवान’, ‘सागर संगम’ अशा अनेक चित्रपटांसाठी अभिनेत्री आशा पारेख ओळखल्या जातात. अभिनेत्री म्हणून तर त्यांची लोकप्रियता आहेच. मात्र, एक दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणूनदेखील त्यांनी इंडस्ट्रीमध्ये ओळख निर्माण केली.
ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख त्यांच्या कामामुळे नाही तर त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही फोटोंमुळे चर्चेत आल्या आहेत. या फोटोंमध्ये त्यांच्याबरोबर त्यांच्या खास मैत्रीणी बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्री हेलन आणि वहिदा रेहमान दिसत आहेत. या तीन ज्येष्ठ अभिनेत्री एकत्र जेवणासाठी बाहेर गेल्या असल्याचे फोटोंमध्ये दिसत आहे. त्यांची अनेक वर्षांची मैत्री आजपर्यंत टिकली आहे.
आशा पारेख यांनी सुंदर लाल रंगाची साडी नेसली आहे. वहिदा रेहमान या राखाडी रंगाच्या साडीमध्ये दिसत आहेत. तर हेलन यांनी काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हेलन व वहिदा यांच्याबरोबरचे फोटो शेअर करताना आशा पारेख यांनी लिहिले, “जब वी मेट. माझ्या आवडत्या लोकांबरोबरचे क्षण खूप आनंददायी होते.”
नेटकरी काय म्हणाले?
बॉलीवूडच्या तीन दिग्गज अभिनेत्रींना एकत्र पाहणे चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणी आहे. चाहत्यांनी या फोटोंवर अनेक कमेंट्स करत त्यांचा आनंद व्यक्त केला आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “आम्हाला चित्रपटांवर प्रेम करायला लावणाऱ्या अभिनेत्रींना एकत्र पाहणे आनंददायी आहे’, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “एका फ्रेममध्ये तीन सुंदर दिग्गज कलाकार. अनेक दशकांपासून आमचे निखळ मनोरंजन केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुम्ही सर्वांनीच हा दर्जा इतका उंचावला आहे की आजची पिढी खूपच कमी पडते असे वाटते.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “या सुंदर दिग्गज अभिनेत्रींना पाहून खूप आनंद झाला”, आणखी एका चाहत्याने आनंद व्यक्त करत लिहिले, “किती छान फ्रेम आहे”, असे म्हणत नेटकरी या तीन अभिनेत्रींवर कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत.




२०२४ मध्ये तिन्ही अभिनेत्री श्रीनगरमध्ये सहलीसाठी गेल्या होत्या. या ट्रिपचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. आशा, वहिदा आणि हेलेन या तिन्ही अभिनेत्री चांगल्या मैत्रिणी आहेत. अनेकदा कार्यक्रमांमध्ये त्या एकत्र दिसतात.
आशा यांच्या कामाबद्दल बोलायचे तर त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली. त्यांनी ‘दिल देके देखो’ मधून मुख्य नायिका म्हणून पदार्पण केले. ‘कटी पतंग’, ‘तिसरी मंझिल’, ‘लव्ह इन टोकियो, आया सावन झूम के आणि मेरा गाव मेरा देश यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
१९५८ मध्ये शक्ती सामंत यांच्या ‘हावडा ब्रिज’ चित्रपटातील ‘मेरा नाम चिन चिन चू’ या गाण्याने हेलन यांना मोठी लोकप्रियता मिळाली.
वहिदा रेहमान यांनी १९५५ मध्ये तेलुगू चित्रपट रोजुलु मरायी द्वारे अभिनयाची सुरुवात केली. गुरु दत्त यांच्या ‘प्यासा’, ‘कागज के फूल’, ‘साहिब बीबी और गुलाम’ यांसारख्या चित्रपटांमुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली.