बॉलीवूडमध्ये काही असेही चित्रपट तयार करण्यात आले जे त्यांच्या कथा, विषय, दृश्ये आणि भाषेमुळे वादात अडकले. या चित्रपटांवर नंतर बंदी घालण्यात आली. कोणताही चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी सेन्सॉर बोर्डाचं सर्टिफिकेट लागतं. चित्रपट प्रदर्शित करण्याचा किंवा त्यावर बंदी घालण्याचा अंतिम निर्णय सेन्सॉर बोर्डाचा असतो. काही वेळा चित्रपटातील काही सीन कट करण्याचे किंवा दृश्ये बदलण्याचे आदेश दिले जातात. तर कधीकधी बोर्ड चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेते. आज अशा काही चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात, ज्यावर बोल्ड कंटेंटमुळे सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली होती.
बँडिट क्वीन
१९९४ मध्ये आलेला ‘बँडिट क्वीन’ हा चित्रपट फूलन देवीच्या जीवनावर आधारित होता. शेखर कपूर दिग्दर्शित या चित्रपटात फूलन देवीची खरी कहाणी दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात लैंगिक शोषण आणि हिंसाचाराची अनेक दृश्ये होती, ज्यामुळे त्यावर बंदी घालण्यात आली होती.
फायर
दीपा मेहता दिग्दर्शित ‘फायर’ मध्ये समलैंगिक संबंध दाखवण्यात आले होते. एक लेस्बियन जोडी उघडपणे दाखवणारा हा पहिला बॉलीवूड चित्रपट होता. याची कथा राधा व सीता या दोन महिलांभोवती फिरते, ज्या त्यांच्या पतींकडून दुर्लक्षित होतात आणि मग भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या एकमेकींच्या जवळ येतात. यात नंदिता दास आणि शबाना आझमी यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाला खूप विरोध झाला होता.
उर्फ प्रोफेसर
२००० मध्ये प्रदर्शित झालेला पंकज अडवाणी यांचा ब्लॅक कॉमेडी चित्रपट ‘उर्फ प्रोफेसर’वर बोल्ड भाषा आणि अश्लील दृश्यांमुळे बंदी घालण्यात आली होती. ही एका अशा व्यक्तीची गोष्ट आहे, ज्याचे आयुष्य एका कॉन्ट्रॅक्ट किलरची कार आणि लॉटरीचे तिकीट हरवल्यावर बदलते. मनोज पाहवा, अंतरा माळी आणि शर्मन जोशीची भूमिका असलेल्या या चित्रपटावरही बंदी घालण्यात आली होती.
द पिंक मिरर
या यादीत ‘द पिंक मिरर’ नावाच्या चित्रपटाचाही समावेश आहे. तृतीयपंथी पात्रांवर आधारित या चित्रपटाला ‘अश्लील आणि आक्षेपार्ह’ म्हणत सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली होती. श्रीधर रंगायन यांचा ‘द पिंक मिरर’, ज्याला ‘गुलाबी आयना’ म्हटलं जातं, हा सिनेमा दोन तृतीयपंथी व एका समलिंगी किशोरवयीन तरुणाची कथा आहे.
पांच
सेन्सॉर बोर्डाने अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘पांच’ या चित्रपटावरही बंदी घातली होती. २००३ साली आलेला हा चित्रपट १९७६-७७ मध्ये पुण्यात घडलेल्या जोशी-अभ्यंकर यांच्या सिरियल मर्डर केसवर आधारित होता, असं म्हटलं जातं. के के मेनन, आदित्य श्रीवास्तव, विजय मौर्य, जॉय फर्नांडिस आणि तेजस्विनी कोल्हापुरे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ शकला नाही कारण त्यात ड्रग्जचा गैरवापर, हिंसाचार आणि असभ्यता दाखवण्यात आली होती.
अनफ्रीडम
२०१४ साली आलेल्या ‘अनफ्रीडम’ चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. या थ्रिलर चित्रपटात दोन बोल्ड थीम होत्या. एक लेस्बियन संबंध व दुसरी इस्लामिक दहशतवादाची थीम होती. राज अमित कुमार दिग्दर्शित या चित्रपटात व्हिक्टर बॅनर्जी, आदिल हुसेन आणि प्रीती गुप्ता हे कलाकार होते.