बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि तिची बहीण समीक्षा पेडणेकर यांनी स्वतःचा पाण्याचा ब्रँड सुरू केला आहे. Backbay (बॅकबे) असं त्यांच्या ब्रँडचं नाव आहे. मागील दोन वर्षांपासून त्या या ब्रँडसाठी मेहनत घेत आहेत. त्यांनी हा ब्रँड सुरू करण्यामागचे कारण, त्याचा उद्देश आणि टार्गेट ऑडियन्स अशा बऱ्याच गोष्टींबद्दल माहिती दिली. तसेच त्यांच्या पाण्याच्या बाटलीची किंमत किती आहे? तेही सांगितलं.

‘नॅचरल मिनरल वॉटर’ हे भूमीच्या ब्रँडचं ब्रीदवाक्य आहे. बॅकबेची ५०० मिली पाण्याची बाटली १५० रुपये आणि ७५० मिली पाण्याची बाटली २०० रुपयांना मिळते. CNBC-TV18 शी बोलताना भूमी म्हणाली, “हिमाचलमध्ये ही आम्ही आमचा स्वतःचा प्लांट उभारला आहे आणि आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे. आमच्या प्लांटचे नेतृत्व महिला करतात. आमच्या प्लांटची दररोजची क्षमता ४५,००० बॉक्स आहे.”

स्पार्कलिंग वॉटरही विकतात पेडणेकर बहिणी

भूमीने सांगितलं की तिच्या ब्रँडच्या बाटलीचे पॅकेजिंग बाजारात मिळणाऱ्या प्लास्टिक आणि काचेच्या बाटलीपेक्षा वेगळे आहे. “आमच्या पॅकेजिंगला विशेषतः गेबल टॉप पेपर पॅकेजिंग म्हणतात. आम्ही पॅकेजिंगच्या बाबतीत एक पाऊल पुढे गेलो आहोत आणि आमची कॅप ही एक बायो कॅप आहे,” असं भूमी म्हणाली. तसेच या प्रकारचे पॅकेजिंग वापरणारी त्यांची भारतातील एकमेव कंपनी आहे, असा दावा भूमीने केला. लिची, पीच व लाइम या तीन प्रकारचे स्पार्कलिंग वॉटरही विकत असल्याचं समीक्षाने सांगितलं.

पाण्याच्या किमतीबद्दल काय म्हणाली भूमी पेडणेकर?

बिझनेस टुडेशी बोलताना भूमीने पाण्याच्या किमतीबद्दल माहिती दिली. “आमच्याकडे ५०० मिली आणि ७५० मिली असे दोन प्रकार आहेत. आम्ही पाण्याची किंमत अतिशय महागड्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि सर्वात कमी किमतीच्या काचेच्या बाटल्या याच्या मध्ये ठेवली आहे. प्लास्टिकची बाटली ९० रुपयांपर्यंत मिळते तर काचेची ६०० रुपयांपर्यंत मिळते. बॅकबेची ५०० मिलीची बाटली १५० रुपयांना आहे आणि ७५० मिलीची बाटली २०० रुपयांना आहे. हे प्रीमियम पाणी आहे, परंतु आम्हाला किंमत अशी ठेवायची होती की जे लोक घेऊ शकतील,” असं भूमी म्हणाली.

“भारतीय ग्राहक एनर्जी ड्रिंक्ससाठी भरपूर पैसे खर्च करतात. त्यामुळे आम्ही लोकांसाठी एक असं प्रॉडक्ट आणलंय जे मूलभूत आहे. हे पाणी आरोग्यासाठी खूप चांगलं आहे,” असं भूमीने नमूद केलं.

१५ वर्षांत घरोघरी पोहोचवायचा आहे ब्रँड

या किमतींमागील कारण भूमीने स्पष्ट केले. “आम्ही हिमालयीन प्रीमियम वॉटर पुरवत आहोत. हे पाणी नैसर्गिकरित्या तयार होणारी खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्सयुक्त आहे. आम्हाला पुढील चार वर्षांत १०० कोटी रुपयांचा टप्पा गाठायचा आहे. आणि १५ वर्षांनंतर आम्हाला आमचा ब्रँड प्रत्येक घरात पोहोचवायचा आहे. आमचे पाणी पाण्याच्या मूळ स्रोतावरच पॅक केलं जातं आणि त्याला मानवी हातांचा स्पर्श होत नाही,” असं भूमी म्हणाली.

भूमीने बिझनेस टुडेशी बोलताना म्हणाली, “२०३० पर्यंत मिनरल वॉटरची बाजारपेठ ३ अब्ज डॉलर्स इतकी असेल. माझं लक्ष्य असे लोक आहे, ज्यांना स्वच्छ पाणी हवंय. भविष्यात मी माझ्या प्रॉडक्टला कुठे पोहोचलेलं पाहते, तर ती ठिकाणं शाळा, कॉर्पोरेट कॅन्टीन, कॉलेज, थिएटर, विमानतळ, हॉटेल आणि रेस्टॉरंट्समध्ये आहेत.”

बॅकबे कंपनीसाठी बाहेरून फंडिंग घेतलेलं नाही, असं भूमीने स्पष्ट केलं. “मी वयाच्या १७ व्या वर्षापासून माझ्या पहिल्या पगारातून पैसे गुंतवण्यास सुरुवात केली होती. माझा पहिला पगार हा यशराज फिल्म्सकडून मिळालेला ७,००० रुपयांचा चेक होता. बॅकबे कमाईतून भरपूर गुंतवणूक केली आहे,” असं भूमी पेडणेकर म्हणाली.