दरवर्षी बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपट तयार होतात आणि प्रदर्शित होतात. या चित्रपटांच्या निर्मितीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. बरेच चित्रपट बॉक्स ऑफिस कमाईच्या बाबतीत इतिहास रचतात, तर अनेक चित्रपट असे असतात जे कधी रिलीज झाले आणि कधी स्क्रीनवरून गायब झाले हे कोणालाही माहीत नसतं.

आज आम्ही तुम्हाला भारतातील सर्वात मोठ्या फ्लॉप चित्रपटाबद्दल सांगणार आहोत. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी निर्मात्यांनी जेवढा खर्च केला होता, त्याच्या एक टक्काही कमाई चित्रपट करू शकला नाही. या चित्रपटात बॉलीवूडमधील दोन आघाडीचे कलाकार होते. या दोघांनी चित्रपटाचं प्रमोशनही केलं नव्हतं. या चित्रपटाचं नाव ‘द लेडी किलर’ आहे.

‘द लेडी किलर’ नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्याचं बजेट कोट्यवधींमध्ये होतं, पण तो एक लाख रुपयेही कमावू शकला नाही. अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर यांनी या सिनेमात मुख्य भूमिका साकारल्या होत्या. क्राईम थ्रिलर ‘द लेडी किलर’चं दिग्दर्शन अजय बहलने केलं होतं.

४५ कोटींचे बजेट, कमावले फक्त ६० हजार

रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचं बजेट ४५ कोटी रुपये होतं. इतक्या मोठ्या बजेटमध्ये तयार झालेला ‘द लेडी किलर’ चित्रपटगृहांमध्ये अपूर्ण प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या शूटिंग आणि निर्मितीत खूप वेळ गेला, पण तरीही तो पूर्ण होऊ शकला नाही. असं असूनही निर्मात्यांनी अचानक निर्णय घेत अर्जुन व भूमीचा हा चित्रपट देशभरात फक्त डझनभर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला. ‘द लेडी किलर’ ची पहिल्या दिवशी फक्त २९३ तिकिटं विकली गेली, त्याची कमाई ३८ हजार रुपये होती. ५०० तिकिटं विकली गेल्यावर या चित्रपटाचे एकूण कलेक्शन ६० हजार रुपये होते. कोट्यवधीचा खर्च करूनही सिनेमाने बॉक्स ऑफिसवर एक लाख रुपयेही कमावले नाही. हा भारतातील बॉक्स ऑफिसवरील सर्वात मोठा फ्लॉप सिनेमा ठरला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘द लेडी किलर’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दिग्दर्शक आणि प्रमुख कलाकारांनी चित्रपटाचे प्रमोशन करण्यास नकार दिला होता. निर्मात्यांच्या ओटीटी प्लॅटफॉर्मसह असलेल्या करारानुसार हा चित्रपट डिसेंबरमध्ये ओटीटीवर येणार होता. पण त्याची कमाई पाहता ओटीटी प्लॅटफॉर्मने हा सिनेमा प्रदर्शित करण्यास नकार दिला होता. शेवटी निर्मात्यांनी तो युट्यूबवर मोफत रिलीज केला होता.