बॉबी डार्लिंगने सुभाष घई यांच्या ‘ताल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात तिने ऐश्वर्या रायच्या डिझायनरची भूमिका साकारली होती. या चित्रपटाशी संबंधित काही किस्से बॉबी डार्लिंगने सांगितले आहेत. चित्रपटातील एका दृश्यादरम्यान दिग्दर्शकाने बॉबीला ऐश्वर्याच्या ब्लाऊजचं हुक लावण्यास सांगितलं होतं. त्यावेळी ऐश्वर्याची फिगर पाहून तिच्याकडे आकर्षित झाल्याचा खुलासा बॉबी डार्लिंगने केला आहे.
सिद्धार्थ कन्ननला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बॉबी डार्लिंग म्हणाली, “मला मिळालेला पहिला चित्रपट सुभाष घई यांचा ‘ताल’ होता, त्या सिनेमात माझा एक छोटासा रोल होता. मी त्यासाठी २५ दिवस शूटिंग केलं होतं, सिनेमातील माझे सीन्स एडिट करणं माझ्या हातात नसतं. मी २५ दिवस शूटिंग केलं आणि मला प्रतिदिन २५०० रुपये मिळाले होते. सुभाष यांनी माझी ‘ताल’साठी ऑडिशन घेतली होती आणि ऑडिशन पाहिल्यानंतर त्यांनी मी त्या रोलसाठी परफेक्ट असल्याचं सांगितलं. हिला ऐश्वर्याच्या डिझायनरची भूमिका द्या, असं ते म्हणाले होते.”
माझे हात भीतीने थरथर कापत होते- बॉबी डार्लिंग
बॉबी डार्लिंग पुढे म्हणाली, “मला ती भूमिका मिळाली आणि शूटिंग सुरू झालं. जेव्हा माझा सीन सुरू झाला तेव्हा सरोज खान मॅडमचे ‘रमता जोगी’ हे गाणे शूट होत होते. गाण्यातील ‘जंगल में कोयल बोले कुक’ या ओळींवर कॅमेरा सुरू झाला होता. समोर ऐश्वर्या राय, मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय उभी आहे आणि सुभाषजी मला सांगतात की तिच्या ब्लाउजचे हुक बंद कर. मी सुभाषसमोर अॅक्शन मोडमध्ये होते. माझे हात भीतीने थरथर कापत होते आणि मी ऐश्वर्याच्या ब्लाऊजचे हुक बंद करत होते. मी म्हणाले काय नशीब, मला काम हवं होतं आणि भगवान शंकरांनी मला थेट ऐश्वर्या रायच्या शेजारी उभं केलं.”
ऐश्वर्या रायकडे आकर्षित झालेली बॉबी डार्लिंग
बॉबी डार्लिंग म्हणाली, “भूमिका लहान असली तरी, ऐश्वर्याला मी रात्रंदिवस भेटत होते. ती खूप नम्र होती, ती खूप गोड होती. नीता लुल्ला तिचे कॉस्च्यूम डिझाईन करत होत्या, मिकी कॉन्ट्रॅक्टर तिचा मेकअप करत असे. आम्ही सर्वजण मित्र झालो होतो. मी ऐश्वर्याबरोबर जेवण केले, असं मी म्हणणार नाही. पण ती खूप नम्र होती आणि तिच्या साधेपणाने मी इतकी मोहित झाले की मी तिच्याकडे आकर्षित झाले. जर मी मुलगा असते तर मलाही तिच्यासारखीच मुलगी हवी असती. ती सडपातळ होती, तिचे फिगर तसे होते.”