Bobby Deol On Jab We Met : जेव्हा जेव्हा बॉलिवूडच्या काही सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा उल्लेख केला जातो, तेव्हा शाहिद कपूर आणि करिना कपूरच्या ‘जब वी मेट’ या चित्रपटाचे नाव आवर्जून घेतलं जातं. प्रेक्षकांना हा चित्रपट इतका आवडला की, शाहिद-करिना यांच्या जोडीसह चित्रपटाच्या दिग्दर्शकाचेही खूप कौतुक झाले. श्रीमंत कुटुंबातील मुलगा आणि देसी मुलगी यांच्यातील अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांना आजही भावते.

बॉबी देओल ‘जब वी मेट’बद्दल काय म्हणाला?

सोशल मीडियावर या चित्रपटाची आणि आदित्य-गीत या जोडीची अजूनही चर्चा असते. मात्र तुम्हाला माहिती आहे का? या चित्रपटातील शाहिदचे ‘आदित्य’ हे पात्र अभिनेता बॉबी देओल करणार होता. याबद्दल स्वत: बॉबी देओलने सांगितलं आहे. इन्स्टंट बॉलीवूडबरोबर केलेल्या संभाषणात बॉबी देओलने ‘जब वी मेट’ या चित्रपटाबद्दल काही खुलासे केले आहेत.

बॉबी म्हणाला, “इम्तियाजने माझ्यासाठी संहीता लिहायला सुरुवात केली”

याबद्दल बॉबी देओल असं म्हणाला की, “मला इम्तियाज अलीच्या चित्रपटासाठी ऑफर आली नव्हती. ज्यावेळी ‘सोचा ना था’ बनत होता, तेव्हा मी रश प्रिंट पाहिली आणि मी इम्तियाजला सांगितले की, हे बघ, मी तुझ्याबरोबर काम करत आहे तू संहिता लिही. त्यानंतर इम्तियाजने माझ्यासाठी संहीता लिहायला सुरुवात केली.”

जब वी मेट चित्रपट पोस्टर (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)
जब वी मेट चित्रपट पोस्टर (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

बॉबी म्हणाला, “‘जब वी मेट’ चित्रपट मी बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली”

यापुढे बॉबीने सांगितलं की, “मी तो (जब वी मेट) चित्रपट बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली. मी खूप लोकांना भेटलो. ‘जब वी मेट’साठी अष्टविनायक या एका निर्मात्याशीही बोललो होतो. पण तो इम्तियाजला दिग्दर्शक म्हणून घेऊ इच्छित नव्हता. आम्हाला इम्तियाज नाही तर दुसऱ्या दिग्दर्शकाबरोबर काम करायचे आहे असं त्याने सांगितलं. तेव्हा इम्तियाज आणि मी खूप चांगले मित्र होतो, अजूनही आहोत.”

बॉबी म्हणाला, “करीना कपूर आणि प्रीती झिंटाशी ओळख करून दिली”

यानंतर बॉबीने म्हटलं की, “‘जब वी मेट’साठी मी दोन अभिनेत्रींची भेट करून दिली होती. त्याला करीना कपूर हवी होती; म्हणून मी कोणामार्फत तरी करीनाशी भेट करून दिली. पण तिने तेव्हा नकार दिला होता. त्यानंतर मी प्रीती झिंटाशी बोललो, तर ती म्हणाली, “मी हे आता करू शकत नाही, मी ते नंतर करेन.”

अभिनेता बॉबी देओल (फोटो सौजन्य :इंडियन एक्सप्रेस)
अभिनेता बॉबी देओल (फोटो सौजन्य :इंडियन एक्सप्रेस)

बॉबी म्हणाला, “शाहिद-करीनाला घेतलं अन् मला चित्रपटातून काढून टाकलं”

यानंतर बॉबीने सांगितलं की, “ही इंडस्ट्री अशी आहे की, मी ज्या निर्मात्याला इम्तियाजला घेऊन चित्रपट करण्यास सुचवले होते, त्याने इम्तियाजला तर घेतले; पण नंतर मला चित्रपटातून काढून टाकलं. त्यांनी करीना-शाहिदला घेतले आणि इम्तियाजने तो चित्रपट बनवला. इम्तियाजसुद्धा तेव्हा त्याच्या करिअरची सुरुवात करत होता. त्यामुळे त्याच्याकडे काही पर्याय नव्हता.”

बॉबी म्हणाला, “चित्रपटातून काढून टाकल्यानंतर खूप नाराज आणि दु:खी होतो”

पुढे बॉबीने दु:ख व्यक्त करत म्हटलं की, “या इंडस्ट्रीत असं होतं. मी तेव्हा नाराज होतो. त्यावेळी मी खूप अस्वस्थ होतो. खूप दुःखी होतो. पण कदाचित हेच माझ्या नशिबात लिहिलेले असेल.” दरम्यान, ऑक्टोबर २००७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘जब वी मेट’ आजही अनेकांचा फेवरेट चित्रपट आहे.