Arshad Warsi Replaced in Jolly LLB 2 : गेल्या काही महिन्यांपासून ‘जॉली एलएलबी’च्या तिसऱ्या भागाची म्हणजेच ‘जॉली एलएलबी ३’ची प्रेक्षकांना खूपच उत्सुकता लागून राहिली होती. ‘जॉली एलएलबी’च्या पहिल्या दोन भागांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. अशातच तिसऱ्या भागाची घोषणा झाली. ही घोषणा झाल्यापासूनच चाहते मंडळी या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच आता या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
‘जॉली एलएलबी’मध्ये अर्शद वारसी मुख्य भूमिकेत होता. त्यानंतर दुसऱ्या भागात अर्शदऐवजी अक्षय कुमार जॉली मिश्राच्या भूमिकेत पाहायला मिळाला. ‘जॉली एलएलबी २’मध्ये अर्शदऐवजी अक्षयला पाहिल्यानंतर अनेकांना यात अर्शद का नाही, असा प्रश्न पडला होता. त्याबद्दल आता स्वत: अर्शदने प्रतिक्रिया दिली आहे.
दी इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, ‘जॉली एलएलबी ३’च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात अर्शदने मजेशीर पद्धतीने सांगितले की, पहिल्या चित्रपटानंतर त्याला काढून काढण्यात आलं आणि त्यासाठी दिग्दर्शक सुभाष कपूर जबाबदार होते, असंही तो म्हणाला. ‘जॉली एलएलबी ३’चा ट्रेलर लाँच कार्यक्रम कानपूरमध्ये पार पडला. त्यावेळी जेव्हा अक्षय कुमार आणि अर्शद यांना स्क्रिप्टमध्ये त्यांनी त्यांची काही मतं दिली का? असं विचारण्यात आलं.
त्यावर अक्षय कुमार म्हणाला, “आमचे दिग्दर्शक स्क्रिप्टबाबत खूप कडक शिस्तीचे आहेत. त्यांनी जे लिहिलंय, तेच आम्ही म्हणावं, यावर त्यांचा कटाक्ष असतो. जर स्क्रिप्टशिवाय आम्ही काही बोललो, तर ते बाहेरचा रस्ता दाखवू शकतात.” अक्षयच्या या विधानावर अर्शदने हसत लगेचच उत्तर दिले, “मी पहिल्या चित्रपटात थोडं स्क्रिप्टबाहेरचं बोलण्याचा प्रयत्न केला… तर त्यांनी मला त्यातून बाहेरच काढलं.”
अर्शद वारसी इन्स्टाग्राम पोस्ट
अक्षय आणि अर्शद दोघेही या मजेशीर आठवणीवर खळखळून हसले. त्यानंतर अक्षय पुढे म्हणाला, “आमचा दिग्दर्शक खरंच खूप कडक शिस्तीचा शिक्षक आहे.” त्यानंतर अर्शदने अक्षयबरोबरच्या कामाबद्दलचा अनुभव शेअर केला.
त्याबद्दल अर्शद म्हणाला, “मला अक्षयबरोबर काम करायला खूपच आवडलं. मला आशा आहे की, आपण अजूनही ‘जॉली’ सीरिजचे भाग करीत राहू. आमच्यातली सगळी गडबड, हट्ट व मस्ती – हे सगळं एकाच व्यक्तीने सांभाळलं – ते म्हणजे सौरभ शुक्ला. सिनेमादरम्यान आम्ही थोडं भांडलोही; पण तरी प्रेमानं चित्रपट केला.”
दरम्यान, ‘जॉली एलएलबी’ २०१३ मध्ये आला होता. त्यातून देशातल्या न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचारावर प्रकाश टाकण्यात आला होता. ‘जॉली एलएलबी’चा दुसरा भाग २०१७ मध्ये आला. आता ‘जॉली एलएलबी ३’मध्ये, वकिलाच्या काळ्या गणवेशात जगदीश्वर मिश्रा (अक्षय कुमार) आणि अर्शद वारसी (जगदीश त्यागी) यांच्यात बरेच वाद होताना ट्रेलरवरून दिसत आहे. १९ सप्टेंबर रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.