Ashutosh Rana Reaction on Marathi Hindi Language Controversy : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात हिंदी-मराठी वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. त्रिभाषा सूत्रानुसार, शाळांमध्ये पहिलीपासूनच हिंदी सक्तीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला. या निर्णयावर राजकीय तसंच मनोरंजन क्षेत्रातील अनेकांकडून विरोध झाला. याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने राज्यात आंदोलनाचा इशाराही दिला. त्यानंतर सरकारकडून हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर रद्द करण्यात आले.
अशातच गेल्या काही दिवसांत मराठी न बोलणाऱ्या अमराठी लोकांना मारहाण केल्याचे काही व्हिडीओही समोर आले. तसंच काहींनी ‘कोणी कितीही सांगितलं, तरी मुंबईत मराठी बोलणार नाही’, असा पवित्राही घेतला. त्यामुळे मराठी भाषेचा मुद्दा आणखीनच चर्चेत आला आहे. मराठी-हिंदीच्या या भाषावादावर अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत मराठी भाषेला पाठिंबा दर्शवला आहे.
त्याचबरोबर काही बॉलीवूड कलाकारांनी सुद्धा याबद्दल थेट प्रतिक्रिया व्यक्त न करता त्यांना याबद्दल जाणीव असल्याचं सांगितलं आहे. अशातच या भाषेच्या मुद्द्यावर बॉलीवूड अभिनेते आणि मराठी अभिनेत्री रेणुका शहाणेंचे पती आशुतोष राणा यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘हीर एक्सप्रेस’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी आशुतोष राणा यांना मराठी भाषेबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
यावेळी ते मराठीत उत्तर देत म्हणाले, “माझ्या मुलांची मातृभाषा मराठी आहे आणि माझ्या बायकोचीही मातृभाषा मराठी आहे”. त्यानंतर त्यांना विचारण्यात आले की, ‘भाषेवरून इतका वाद सुरू आहे, तुम्ही घरी काय करता?’ यावर उत्तर देत आशुतोष राणा म्हणाले, “भाषा हा संवादाचा विषय असतो. भाषा कधीच वादाचा विषय नसतो. भारत हा इतका महान देश आहे; जिथे सर्व गोष्टींचा स्वीकार केला आहे. भारत देश संवादावर विश्वास ठेवतो, भारत कधीही वादावर विश्वास ठेवत नाही.”
दरम्यान, ‘हीर एक्सप्रेस’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, यात आशुतोष राणांबरोबरच दिव्या जुनेजा आणि प्रीत कामानी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. उमेश शुक्ला यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाद्वारे दिव्या बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. हा चित्रपट ८ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.