आपल्या सिनेमांबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहणारा बॉलीवूड अभिनेता म्हणजे गोविंदा. काही दिवसांपूर्वी गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यात मतभेद झाले आहेत आणि दोघेही घटस्फोट घेण्याचा विचार करत आहेत असे वृत्त आले होते. मात्र, गोविंदाची पत्नी सुनीताने या सगळ्या बातम्या खोट्या असल्याचे स्पष्टपणे सांगितलं. घटस्फोटाबद्दलच्या वृत्तांनंतर सुनीताने मुलाखतींमधून हे स्पष्ट केलं की, ती गोविंदाबरोबर अगदी आनंदात आहे आणि ती त्याच्यापासून घटस्फोट घेत नाहीये.
अशातच तिने या सगळ्याचा तिला खूप त्रास झाल्याचं सांगितलं आहे. ‘गेलं एक-दीड वर्ष खूप कठीण होतं आणि किती तरी लोकांनी आमच्याबद्दल काहीतरी बकवास केली’ अशा शब्दांत गोविंदाची पत्नी आहुजाने तिच्या भावना व्यक्त केल्या. गेल्या वर्षभरात गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांनी अनेक मुलाखतींमध्ये आपल्या पतीबद्दल आणि मुलांबद्दल मोकळेपणाने बोलली. त्या काळातच तिने स्वत:चं युट्युब चॅनल सुरू करणार असल्याचं म्हटलं होतं.
अशातच सुनीता आहुजाने स्वत:चं युट्यूब चॅनेल सुरू केलं असून या चॅनेलवर तिने स्वत:चा पहिला व्लॉग व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने चंदीगडमधील एका मंदिराला भेट दिली असल्याचं पहायला मिळत आहे. यावेळी ती म्हणते, “जेव्हा मी तरुण होते आणि गोविंदावर प्रेम करत होते, तेव्हा मी देवीकडे प्रार्थना केली होती की, तोच माझा नवरा व्हावा.” हे बोलताना सुनीता भावुक झाली. यापुढे ती म्हणाली, “देवीने मला एक यशस्वी नवरा आणि दोन सुंदर मुले दिली, ही तिचीच कृपा आहे.”
यापुढे सुनीता म्हणते, “देवीने माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. आज मी जे काही आहे ते तिच्यामुळेच… प्रत्येक गोष्टीत सुख मिळणं सोपं नाही. आयुष्यात चढ-उतार येतच असतात. कोणीही माझं घर तोडण्याचा प्रयत्न करूदे. पण माझा माझ्या देवीवर विश्वास आहे. मला जो कोणी दु:ख देण्याचा प्रयत्न करेल, त्याला माझी देवी नक्कीच शिक्षा देईल. कारण एका चांगल्या व्यक्तीला, चांगल्या स्त्रीला दु:ख देणं चांगली गोष्ट नाही. माझा देवीआईशिवाय कुणावरही विश्वास नाही. आज माझ्यावर जी परिस्थिती आहे, माझा घर-परिवार तोडण्याचा जो कोणी प्रयत्न करत आहे, मग तो कोणी घरचा असो किंवा बाहेरचा असो… माझी देवीआई त्यांना सोडणार नाही.”
या व्हिडीओच्या शेवटी, सुनीताने आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. याबद्दल ती म्हणाली, “गोविंदा आणि माझ्या नात्याबाबत अनेक जण चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत. मी माझं युट्युब चॅनल सुरू केलं आहे ते याच कारणासाठी – जेणेकरून मी स्वतः माझी बाजू सांगू शकेन.” दरम्यान, सुनीता आणि गोविंदा यांचं १९८७ साली लग्न झालं. त्यांना मुलगा – यशवर्धन आहुजा आणि मुलगी – टीना आहुजा, अशी दोन मुलं आहेत.