Irrfan Khan Angry on Naseeruddin Shah and Om Puri : आपल्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा प्रसिद्ध अभिनेते म्हणजे इरफान खान. इरफान खान यांनी आतापर्यंत अनेक हिंदी, इंग्रजी चित्रपट आणि बऱ्याच मालिकांमध्येही काम केलं होतं. या सगळ्याच सिनेमांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. इरफान यांच्या काही गाजलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे ‘मकबुल’.
इरफान खान यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक प्रभावी आणि दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत, पण त्यांचा ‘मकबूल’ आजही सर्वोत्कृष्ट सिनेमा मानला जातो. विशाल भारद्वाज यांचा ‘मकबूल’ हा इरफान यांच्यासाठीच नव्हे; तर या चित्रपटाशी जोडलेल्या प्रत्येक कलाकाराच्या करिअरसाठीही हा एक महत्त्वाचा सिनेमा आहे.
‘मकबूल’ सिनेमात नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर, ओम पुरी, तब्बू, पीयूष मिश्रा, आणि यांच्यासह दीपक डोब्रियाल यांसारखे काही नवखे चेहरेही होते. याच सिनेमाबद्दल ‘स्क्रीन’ला दिलेल्या खास मुलाखतीत, दीपक डोब्रियाल यांनी इमरान खान यांच्याबद्दलची एक आठवण सांगितली.
‘मकबूल’च्या सेटवर इमरान खान यांनी आपला संयम गमावल्याचा एक प्रसंग शेअर केला. तसंच यावरून त्यांच्या अभिनयातली एकाग्रताही दिसून येत असल्याचं दीपक डोब्रियाल यांनी सांगितलं.
याबद्दल दीपक सांगतात, “एक सीन होता जिथं काका (पीयूष मिश्रा) यांचा खून होतो आणि त्यांचं प्रेत इरफान यांच्या घरी आणलं जातं. तेव्हा इरफान भैय्या शोक करत असताना, कोणी तरी ओम पुरी यानां विचारतात की प्रेत कुठे सापडलं? ते उत्तर देतात, ‘हवेलीच्या मागच्या अंगणात’. पण त्यांनी ‘हवेली’ हा शब्द इतक्या मजेशीर पद्धतीनं उच्चारला की, सेटवर सगळे हसू लागले. त्यामुळे सीन थांबवावा लागला.”
यानंतर दीपक डोब्रियाल सांगतात, ओम पुरींनी ‘हवेली’ या शब्दाचे मुद्दाम पंजाबी उच्चार करायला सुरुवात केली. इतकंच नव्हे तर नसीरुद्दीन शाहदेखील त्या मजेत सहभागी झाले. यामुळे संपूर्ण सेटवर मजा-मस्ती सुरू झाली होती. त्या सीनचं शूट काही केल्या पूर्ण होत नव्हतं. एकामागोमाग एक, अनेक टेक्स घ्यावे लागले.”
यापुढे दीपक सांगतात, “या सीनमध्ये इरफान खान अतिशय भावनिक होऊन जाऊन अभिनय करत होते. ते पात्रात पूर्णपणे बुडालेले होते, त्यामुळे सीन वारंवार थांबणं त्यांना त्रासदायक वाटत होतं. पण कुणालाही ओमजी किंवा नसीरुद्दीन यांना काही बोलायची हिंमत झाली नाही. कारण ते दोघंही महान आणि दिग्गज कलाकार…”
यापुढे दीपक म्हणाले, “एक टेक सुरू असताना, इरफान खान यांचा संयम सुटला आणि ते अचानक भडकले. त्यांनी शॉट चालू असतानाच शिवी दिली. पण लगेचच त्यांनी माफीही मागितली आणि म्हणाले, ‘सॉरी, मला वाटलं की, शिवी दिल्यामुळे भावनिक अभिनय चांगला होईल.’ तेवढ्यात दोघंही (ओम पुरी आणि नसीरुद्दीन शाह) एकदम गप्प झाले. मग सेटवरचा सगळा माहोल क्षणात गंभीर झाला. मग आम्ही अखेरचा टेक यशस्वीपणे घेतला.”