Sanjay Dutt Reveals 72 Crore rs Property By Female Fan : कलाकार आणि त्यांचे चाहते… यांचं एक अनोखं नातं असतं. काही चाहते त्यांच्या आवडत्या कलाकारांसाठी अगदी काहीही करण्यापर्यंत मजल मारतात. आतापर्यंत चाहत्यांनी आपल्या आवडत्या कलाकारांसाठी केलेल्या अनेक विचित्र, चांगल्या आणि हटके गोष्टी चर्चेत राहिल्या आहेत. अशीच एक चाहती होती, जिने तिच्या मृत्यूनंतर सगळी संपत्ती तिच्या आवडत्या अभिनेत्याच्या नावावर केली.

बॉलीवूड अभिनेता संजय दत्तच्या एका चाहतीने एक-दोन नव्हे, तर तब्बल ७२ कोटी रुपयांची संपत्ती त्याच्या नावे केली होती. २०१८ मध्ये संजय दत्तला पोलिसांचा फोन येतो आणि त्याला सांगण्यात येते की, त्याच्या एका महिला चाहतीने तिची ७२ कोटी रुपयांची मालमत्ता अभिनेत्याच्या नावावर केली आहे. हे ऐकून अभिनेत्याला मोठा धक्काच बसतो.

संजय दत्तच्या चाहतीने बँकेला अनेक पत्रे लिहून तिची संपूर्ण मालमत्ता तिचा आवडता अभिनेता संजय दत्तच्या नावावर करण्याची विनंती केली होती. त्याबद्दल आता स्वत: संजय दत्तने खुलासा केला आहे. तसेच त्यानं या संपत्तीचं नेमकं काय केलं? याबद्दलही सांगितलं आहे.

‘कर्ली टेल्स’शी झालेल्या गप्पांदरम्यान, अभिनेत्याला विचारण्यात आलं की, एका महिला चाहतीनं तिची ७२ कोटींची संपत्ती त्याच्या नावे केली होती, तर हे खरं आहे का? संजय दत्तनं या प्रश्नाचं होकारार्थी उत्तर दिलं. त्यानंतर त्याला त्यानं या पैशांचं काय केलं? असं विचारलं असता, “मी ते सगळ पैसे तिच्या कुटुंबाला परत दिले”, असं सांगितलं.

गेल्या अनेक दशकांत संजय दत्तने ‘विधाता’, ‘नाम’, ‘साजन’, ‘खलनायक’, ‘वास्तव’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून त्याने बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. संजय दत्तच्या अभिनयाचे आज असंख्य चाहते आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, संजय दत्तच्या आगामी कामाबद्दल बोलायचं झालं, त्याचे ‘अखंड २’, ‘धुरंधर’, आणि ‘द राजासाहेब’ हे चित्रपट वर्षअखेरीस प्रदर्शित होणार आहेत. त्याचबरोबर २०२६ मध्ये तो कन्नड चित्रपट ‘केडी – द डेव्हिल’च्या प्रमुख भूमिकेतही दिसणार आहेत.