एखाद्या नाटकात किंवा सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करायला मिळणं ही कलाकारासाठी भाग्याचीच गोष्ट आहे. आजवर अनेक कलाकारांनी विविध कलाकृतींतून छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. अशातच काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरही छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपट घेऊन येणार असल्याची माहिती होती; मात्र आता हा चित्रपट थांबवण्यात आला आहे.
अमित राय दिग्दर्शित आणि शाहिद कपूरची मुख्य भूमिका असलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक चित्रपट सध्या थांबवण्यात आला आहे. त्याचं नेमकं कारण गुलदस्त्यात ठेवत, राय यांनी एका मुलाखतीत याबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी इंडस्ट्रीतील काही गंभीर समस्यांवर आपली नाराजीही व्यक्त केली.
‘मिड-डे’ला दिलेल्या मुलाखतीत राय म्हणाले, “इथे दिग्दर्शकानं कसं काम करायचं? कास्टिंग, प्रॉडक्शन, स्टार्स आणि त्यांचं मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टी खूप कठीण आहेत. एखाद्या कथेवर तुम्ही पाच वर्षं काम करता आणि अचानक कुणीतरी फक्त पाच पानांत काय चूक आणि काय बरोबर आहे, हे ठरवतो.”
अमित राय यांच्या ‘OMG 2’ने १८० कोटींचा गल्ला जमवला. तरी ते पुरेसं नाही. त्याद्वारे त्यांनी त्यांचं कौशल्य सिद्ध केलं असलं तरीही त्यांना पुढील चित्रपटासाठी साथ मिळाली नाही. शिवाजी महाराजांवरील चित्रपटाची कथा त्यांनी स्वतः लिहिली होती; पण ती पुढे नेण्याची संधी त्यांना मिळाली नाही. याबद्दल त्यांनी, “कधी कधी वाटतं की, फक्त दिग्दर्शक होऊन काहीच होणार नाही. त्यासाठी निर्माताच बनावं लागेल”, असं म्हटलं.
अमित राय यांनी त्यांच्या या संवादातून शाहिद कपूरबरोबरचा हा चित्रपट बंद होण्याचं नेमकं कारण सांगितलं नाही. पण, आता अनेक चाहते शाहिद कपूरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहू शकणार नाहीत हे निश्चित झालं आहे.
दरम्यान, शाहिद कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो ‘देवा’ या चित्रपटात झळकला होता. त्यात त्याच्यासह अभिनेत्री पूजा हेगडे होती. त्यानंतर आता लवकरच तो ‘Cocktail’ या चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये दिसणार असल्याचं वृत्त आहे. या चित्रपटात अभिनेत्री कृती सेनन आणि रश्मिका मंदानाही आहेत.