९० च्या दशकात चित्रपटसृष्टीवर अंडरवर्ल्डचं वर्चस्व होतं. त्यावेळी बऱ्याचदा बॉलिवूडचं अंडरवर्ल्डशी असलेलं कनेक्शन समोर आलं होतं. नुकतंच अभिनेता सुनील शेट्टी याने यावर भाष्य केलं आहे. तो चित्रपटात काम करत असताना बऱ्याचदा त्याला अंडरवर्ल्ड करून वेगवेगळी कामं करण्यासाठी फोन यायचे तेव्हा सुनील फोनवर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायचा. एका मुलाखतीमध्ये सुनील शेट्टीने या गोष्टीचा खुलासा केला. सुनील याबद्दल म्हणाला, "त्याकाळी अंडरवर्ल्डचा दबदबा फारच वाढला होता. मला त्यांच्याकडून बऱ्याचदा धमकीचे फोन यायचे. त्या बदल्यात मी त्यांना शिव्या देत असे. माझं हे वर्तन पाहून पोलीस माझ्यावरच चिडायचे. ते मला सांगायचे तू काय करतोस. तुझं डोकं ठिकाणावर आहे का? अंडरवर्ल्डच्या लोकांना राग येईल आणि त्यामुळे ते कोणतंही पाऊल उचलू शकतात." आणखी वाचा : "गांधीजी वाईट नव्हते, पण…" रणदीप हुड्डाच्या बहुचर्चित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित सुनीलच्या अशा वागण्याने पोलिसही हैराण होत, पण यात सुनीलची काहीच चूक नसल्याने तोदेखील पोलिसांना सांगायचा की तुम्ही त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करायला हवी. सुनीलमध्ये ही हिंमत त्याच्या वडिलांमुळे आली असंही त्याने या मुलाखतीमध्ये सांगितलं. जर तुमची चूक नसेल तर घाबरायची काही गरज नाही ही शिकवण त्याच्या वडिलांनी त्याला दिली होती. अंडरवर्ल्डच्या विरोधात बोलणारा सुनील शेट्टी हा पहिला कलाकार नाही. याआधी 'चोरी चोरी चुपके चुपके' या चित्रपटादरम्यान अंडरवर्ल्डकडून धमक्या आल्यामुळे अभिनेत्री प्रीती झिंटानेही अंडरवर्ल्डविरोधात वक्तव्य केले होते. केवळ प्रीतीच नव्हे तर तेव्हा शाहरुख खान, सलमान खान, राकेश रोशन आणि महेश मांजरेकर या कलाकारांनाही धमक्यांचे फोन आलेले होते.