कर्नाटक विधानसभेच्या २२४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज शनिवारी (१३ मे) होत आहे. मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष काँग्रेसच्या बाजूचे होते. तोच कल आता मतमोजणीतही दिसून आला. यानुसार काँग्रेस बहुमताचं सरकार स्थापन करेल आणि यासह सलग एकाच पक्षाकडे सत्ता न देण्याची कर्नाटकातील ३८ वर्षांची जुनी परंपरा कायम राहिली. या निकालाबद्दल देशभरात उत्सुकता पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर वेगवेगळ्या स्तरातून लोक या निवडणुकींच्या निकालावर भाष्य करत आहेत. नुकतंच बॉलीवूडमधील अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल आर. खान म्हणजेच केआरके याने एका ट्वीटच्या माध्यमातून सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेची बरोबरी करत काही आकडे मांडले आहेत.
आणखी वाचा : Karnataka Assembly Election 2023 : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मान्य केला पराभव; म्हणाले, “आम्ही…”
कर्नाटकमध्ये भाजपा आणि कॉंग्रेसने घेतलेल्या रॅली आणि त्यातून आखला गेलेला जिंकण्याचा स्ट्राइक रेट यावर केआरके ट्वीट करत म्हणाला, “श्रीयुत राहुल गांधी यांनी कर्नाटकात २२ रॅलीज केल्या आणि त्यांचा विजयाचा स्ट्राइक रेट हा तब्बल ६८% आहे, जो इतर राजकारण्यांच्या तुलनेत चांगलाच भक्कम आहे. मोदीजी यांनी ४२ रॅलीज केल्या आणि त्यांचा स्ट्राइक रेट ४०%आहे. यावरून हे सिद्ध होतं की राहुल गांधी हेच भारतीय जनतेचे आवडते राजकीय नेते आहेत.”
केआरकेच्या या ट्वीटवरून काही लोकांनी त्याला ट्रोल केलं आहे तर काही कॉंग्रेसच्या समर्थकांनी त्याचं कौतूकही केलं आहे. अशाच वादग्रस्त ट्वीटमुळे केआरके हा सतत चर्चेत असतो. राजकारण, बॉलीवूडच्या कम्पूशाहीबद्दल केआरकेने केलेली ट्वीट्स ही चांगलीच व्हायरल होतात.