Actress who quit Bollywood and now runs a billion dollar company: बॉलीवूडमध्ये काम केलेल्या अनेक अभिनेत्री काही काळानंतर कोणत्या चित्रपटात दिसत नाहीत. त्या नेमक्या काय करत असतील, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत.
अजय देवगण, संजय दत्त या बॉलीवूडच्या लोकप्रिय अभिनेत्यांबरोबर दिसलेली अभिनेत्री मयुरी कांगो सध्या चित्रपटात सक्रिय असल्याचे दिसत नाही. पण, याचे कारण तुम्हाला माहित आहे का?
कोण आहे मयूरी कांगो?
तत्कालीन औरंगाबादमध्ये मयुरी कांगोचा जन्म झाला. ती तिथेच वाढली. सेंट फ्रान्सिस डी सेल्स स्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले आणि नंतर देवगिरी कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. तिच्या आईने अभिनयाची आवड निर्माण केली. आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश मिळाल्यानंतरही तिने अभिनय करण्याचा निर्णय घेतला.
१९९५ साली प्रदर्शित झालेल्या ‘नसीम’ या चित्रपटातून मयुरीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकले. या चित्रपटातील मयुरीचे काम पाहिल्यानंतर महेश भट्ट यांनी तिला त्याच्या पापा कहते है या चित्रपटात भूमिका दिली. या चित्रपटातील ‘घर से निकलते ही’ या गाण्याने अभिनेत्रीला मोठी प्रसिद्धी मिळाली.
मयूरी कांगोचे चित्रपट
त्यानंतर मयुरीने १९९७ साली प्रदर्शित झालेल्या ‘बेताबी’ या चित्रपटात काम केले. अजय देवगणबरोबर ‘होगी प्यार की जीत’ या चित्रपटात काम केले. हा चित्रपट १९९९ साली प्रदर्शित झाला होता. बॉबी देओलबरोबर अभिनेत्री ‘बादल’ या २००० साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातही दिसली होती. तसेच, महेश बाबूबरोबर ‘वामसी’ या चित्रपटातही तिने काम केले.
विशेष म्हणजे तिने फक्त चित्रपटांतच काम केले नाही. तर डॉलर बहू, करिश्मा – द मिरॅकल्स ऑफ डेस्टिनी या मालिकांमध्येही ती दिसली.
२८ डिसेंबर २००३ रोजी, मयुरी यांनी आदित्य ढिल्लन यांच्याशी लग्नगाठ बांधली. आदित्य ढिल्लन हे अनिवासी भारतीय (NRI) आहेत. त्यांना २०११ मध्ये मुलगा झाला.
बॉलीवूड सोडले…
मयुरी कांगोने यशाच्या शिखरावर असताना चित्रपट उद्योगापासून दूर जाण्याचा आणि करिअरचा वेगळा मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला. आदित्य ढिल्लनशी लग्न केल्यानंतर ती अमेरिकेत वास्तव्यास गेली. तिथे गेल्यानंतर ती पुन्हा शिक्षणाकडे वळली. तिने न्यू यॉर्कमधील बारूच कॉलेजमधून मार्केटिंग आणि फायनान्समध्ये एमबीए केले आणि २००७ मध्ये पदवी प्राप्त केली.
आता काय करते?
मयुरीने तिच्या कॉर्पोरेट प्रवासाची सुरुवात ३६०i या डिजिटल मार्केटिंग कंपनीतून असोसिएट मीडिया मॅनेजर म्हणून केली. २००९ मध्ये रिझॉल्यूशन मीडियामध्ये काम केले. त्यानंतर तिने डिजिटासमध्ये असोसिएट डायरेक्टर म्हणून काम केले.
२०१२ मध्ये मयुरी भारतात परतली आणि झेनिथ या कंपनीमध्ये मुख्य डिजिटल अधिकारी म्हणून काम पाहिले. नंतर तिने परफॉर्मिक्समध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले आणि २०१९ मध्ये गुगल कंपनीत भारताची हेड ऑफ इंडस्ट्री म्हणून रुजू झाली. २०२४ मध्ये तिला एआय, मार्टेक आणि मीडिया सोल्युशन्ससाठी हेड ऑफ इंडस्ट्री म्हणून बढती देण्यात आली.
मयुरी कांगो आता पब्लिसिस ग्रुपचे सीईओ आहे आणि पब्लिसिस ग्लोबल डिलिव्हरीच्या ग्लोबल एक्झिक्युटिव्ह टीमची सदस्य आहेत. ऑगस्ट २०२५ मध्ये मयुरी पुन्हा पब्लिसिस ग्रुपमध्ये सामील झाली आहे.