Janhavi Kapoor Answer To Trollers : राज्यभरात शनिवारी (१६ ऑगस्ट) दहीहंडी उत्सव मोठ्या आनंदात पार पडला. दहीहंडीनिमित्त अनेक बालगोपाळांमध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण होतं. या कार्यक्रमांना अनेक कलाकारांनीसुद्धा उपस्थिती लावली होती. बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरही दहीहंडीच्या एका कार्यक्रमात उपस्थित होती. घाटकोपर येथे आमदार राम कदम यांच्याकडून दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला जान्हवीने हजेरी लावली होती.

जान्हवी सध्या तिच्या आगामी ‘परम सुंदरी’ या सिनेमानिमित्त चांगलीच चर्चेत आहे. या दहीहंडीच्या कार्यक्रमात तिने सिनेमाच्या प्रमोशनसाठीच खास उपस्थिती लावली होती. या दहीहंडीच्या कार्यक्रमाचे अनेक फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यापैकीच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात आमदार राम कदम अभिनेत्रीला ‘भारत माता की जय’ म्हणायला सांगत आहेत.

या व्हिडीओत आमदार राम कदम “बोलो भारत माता की जय” अशा घोषणा देत आहेत. त्यानंतर ते जान्हवीलाही घोषणा देत दहीहंडी फोडण्यासाठी सांगत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. दहीहंडी कार्यक्रमातील जान्हवीचा हा व्हिडीओ व्हायरल करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं होतं. स्वातंत्र्य दिन आणि दहीहंडी एकाच दिवशी साजरा केल्याचं म्हणत जान्हवीला ट्रोल करण्यात आलं होतं. मात्र, या ट्रोलर्सला जान्हवीनेही चांगलंच सुनावलं आहे.

जान्हवीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. तिने मूळ व्हिडीओ शेअर करत लिहिलंय, “हा पूर्ण व्हिडीओ पाहा… त्यांनी सांगितल्यानंतर जर मी म्हणाले नसते तरी प्रॉब्लेम झाला असता आणि बोलले तरी व्हिडीओ एडिट करून मीम मटेरियल… तसं तर फक्त जन्माष्टमीला नव्हे; मी रोज ‘भारत माता की जय’ म्हणणार.” त्यामुळे उगाच ट्रोल करणाऱ्यांना जान्हवीने स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे.

या कार्यक्रमात जान्हवीने मराठीतून भाषणही दिलं आणि प्रेक्षकांना ‘परम सुंदरी’ चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं. दरम्यान, जान्हवीच्या या ‘परम सुंदरी’ सिनेमात तिच्यासह अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रादेखील प्रमुख भूमिकेत आहे. येत्या २९ सप्टेंबर रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.