Bollywood Actress On Her Bollywood Career : अभिनेत्री शिल्पा शेट्टीने बॉलीवूडमध्ये आपलं चांगलंच नाव कमावलं आहे. पण त्या तुलनेत तिची बहीण शमिता शेट्टीला इंडस्ट्रीत तितकं काम मिळालं नाही. २००० साली शमिताने ‘मोहब्बते’ सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र यानंतर तिला म्हणाव्या तशा सिनेमांच्या ऑफर्स आल्या नाहीत.
शमिताने तिच्या ‘मोहब्बते’ या पदार्पणाच्या चित्रपटात शाहरुख खान, अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्याबरोबर काम केलं होतं. पण तरीही या सिनेमानंतर तिला फार कमी भूमिका ऑफर झाल्या आणि ज्या सिनेमांत तिने काम केलं. ते सिनेमे कधी रिलीजच झाले नाहीत. त्यामुळेच शमिताने इंटिरिअर डिझायनरचं शिक्षण घेतलं.
याबद्दल शमिताने नुकत्याच एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली. तसंच शिल्पा शेट्टीची बहीण असूनही विशेष वागणूक मिळाली नाही. त्यामुळे काही काळानंतर चांगल्या भूमिका मिळणं थांबलं आणि करिअरमध्ये वेगळे मार्ग शोधावे लागले हेही शमिताने कबूल केलं. याबद्दल शमिताने पिंकव्हिलाशी साधलेल्या संवादात सविस्तरपणे सांगितलं.
या मुलाखतीत जेव्हा शमिताला तिला तिच्या करिअरबद्दल समाधान आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा शमिता उत्तर देत असं म्हणाली, “माझ्या पदार्पणानंतरही मला काही सिनेमे मिळाले. पण ते कधीच प्रदर्शितच झाले नाहीत. ‘मोहब्बतें’नंतर मी संजय दत्त आणि चंद्रचूड सिंगबरोबर एक सिनेमा केला होता. तो पूर्ण झाला, पण रिलीज झाला नाही. आणखी तीन सिनेमे केले, त्यापैकी एक माधवनबरोबर होता. तेदेखील कधीच प्रदर्शित झाले नाहीत.”
यानंतर ती म्हणते, “कदाचित अनेक वेळा मला नशिबाने साथ दिली नाही. पण मी तक्रार करणारी व्यक्ती नाही. मला आयुष्यात जे मिळालं त्याबद्दल मी आभारी आहे. आज मी अशा टप्प्यावर आहे जिथे मला स्वतःसाठी संधी निर्माण कराव्या लागतात. मी इंटिरिअर डिझाईनचं शिक्षण घेतलं आहे. इव्हेंट्स करताना आणि इतर कामं करताना मी अजूनही दिग्दर्शक, निर्माता आणि कास्टिंग एजंट्सना भेटण्याचा प्रयत्न करते.”
जेव्हा भूमिका मिळेनाशा झाल्या, तेव्हा शमिताने इंटिरिअर डिझाईनचं शिक्षण घेतलं. याबद्दल अभिनेत्री म्हणाली, “नवीन गोष्ट शून्यातून उभारताना मला समाधान मिळालं. मला नेहमी वाटतं की, जीवनात प्रत्येक गोष्ट योग्य वेळीच घडते. इंटिरिअर डिझाईनसारखी गोष्ट माझ्या आयुष्यात आली, जेव्हा मला स्वतःला व्यक्त करण्याचा मार्ग हवा होता. मी सुमारे सहा महिने लंडनमध्ये शिकले. तिथून भारतात परतल्यावर एका आर्किटेक्टबरोबर वर्षभर काम केलं. त्यानंतर मी स्वतःची कंपनी सुरू केली.”