मल्याळम, तेलुगू चित्रपटसृष्टीप्रमाणेच सध्या कन्नड चित्रपटसृष्टीतही वेगवेगळे प्रयोग आपल्याला पाहायला मिळत आहे. नुकताच हिंदीमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कांतारा’ या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा सुरू आहे. कन्नड भाषेत तर या चित्रपटाने तूफान कमाई केली आहेच. आता हिंदीमध्येही या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळताना आपल्याला दिसत आहे. सामान्य माणसापासून सेलिब्रिटीपर्यंत कित्येकांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. कन्नड भाषेत या चित्रपटाने केवळ ७ दिवसात ४० कोटींची कमाई केली आहे.

‘कांतारा’ हा चित्रपट कर्नाटकातील एका लोककलेवर आणि तिथल्या अनुसूचित वर्गाच्या रूढी परंपरा यांच्यावर आधारित आहे. तसेच गावातील जमीनदार वर्गाची मक्तेदारी आणि त्यांनी केलेल्या अन्याय या गोष्टीलासुद्धा या चित्रपटाच्या माध्यमातून वाचा फोडायचा प्रयत्न केला आहे. सध्या या चित्रपटाला आयएमडीबी या साईटवर सर्वात जास्त रेटिंग मिळालं आहे. बॉलिवूडमधील कित्येक कलाकारांनी ही या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनीसुद्धा या चित्रपटाचा लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता रिषभ शेट्टी याची प्रशंसा केली आहे.

राम गोपाल वर्मा ट्वीट करत म्हणाले, “कांतारासारखा मोठा धडा संपूर्ण चित्रपटसृष्टीला शिकवल्याबद्दल रिषभ शेट्टी तुझे मनापासून आभार मानतो. मनोरंजनसृष्टीतील लोकांनी तुला यासाठी वेगळी वेगळी ट्यूशन फी द्यायला हवी. बिग बजेट चित्रपट बनवणाऱ्या निर्मात्यांची झोप या कांताराने उडवली आहे. २००, ३००, ५०० कोटी कमावणाऱ्या फिल्ममेकर्ससाठी कांतारा हा एक हार्टअटॅकहून कमी नाही.”

राम गोपाल वर्मा यांनी रिषभचं तोंड भरून कौतुक केलं आणि बॉलिवूडच्या या बिग बजेट चित्रपटांची चांगलीच शाळा घेतली आहे. रिषभच्या या चित्रपाटाने प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणलं असल्याचंही त्यांनी यात स्पष्ट केलं आहे. रिषभने नुकतंच हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. रिषभ म्हणाला, “सर्वप्रथम आम्ही या चित्रपटाचं डबिंग करणारच नव्हतो. ओटीटीवर प्रदर्शित करताना हा चित्रपट डब करू असा आमचा विचार होता. पण गेल्या काही दिवसांत या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद बघता आम्ही तो हिंदीमध्ये डब करायचा निर्णय घेतला.” सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई करत आहे.