Vivek Agnihotri Clarify His Marathi Food Statement : काही दिवसांपासून बॉलीवूडचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे त्यांच्या एका वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत आहेत. विवेक अग्निहोत्रींनी एका पॉडकास्टमध्ये मराठी जेवणाबद्दल वक्तव्य केलं होतं. त्यामुळे ते वादात अडकले होते. मराठी जेवणाला गरिबांचं जेवण म्हटल्यानं त्यांच्यावर बरीच टीका झाली. या प्रकरणी त्यांनी आता स्वत:ची बाजू मांडली आहे.
नुकत्याच एका मुलाखतीत विवेक अग्निहोत्री यांनी मी तेव्हा ते मजामस्करीत बोलल्याचं सांगितलं. Curly Tales बरोबरच्या संवादात विवेक अग्निहोत्रींना पल्लवी जोशींनी कोणते मराठी खाद्यपदार्थ खायला सांगितले होते, असा प्रश्न विचारला होता.
त्या प्रश्नाचं उत्तर देताना विवेक अग्निहोत्री म्हणालेले, “मी दिल्लीचा असल्याने मला झणझणीत आणि मसालेदार जेवणाची सवय होती. लग्नानंतर पल्लवीनं मला वरण-भात खा, असं म्हटलं होतं. पण त्या वरणामध्ये मीठसुद्धा नसतं. तेव्हा मला सुरुवातीला वाटायचं की, हे काय गरिबांचं जेवण आहे.”
त्यानंतर विवेक अग्निहोत्रींवर सोशल मीडियावर बरीच टीका करण्यात आली. मराठी इंडस्ट्रीमधील नेहा शितोळे आणि दिग्दर्शक महेश टिळेकर यांनीसुद्धा त्यांच्यावर परखड शब्दांत टीका केली होती. त्यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर झालेल्या गदारोळावर आता विवेक अग्निहोत्रींनी स्पष्टीकरण दिलं आहे. माझ्या वाक्याचा विपर्यास केला गेल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
The Raunac Podcast ला दिलेल्या मुलाखतीत विवेक अग्निहोत्री म्हणाले, “आमच्याकडे Currly Tales ची मुलगी पॉडकास्ट करण्यासाठी आली होती, तेव्हा गप्पा मारताना दिल्लीहून मुंबईला गेलो, तेव्हा पल्लवी जोशीने मला वरण-भात खायला दिलं आणि तेव्हा मी मजामस्करीत असं म्हटलं की, त्यांच्या जेवणात मीठही नसतं. हे काय गरीब लोकांचं जेवण आहे वगैरे वगैरे… पण त्यानंतर मी हेही म्हटलं होतं की, मोठं झाल्यावर अक्कल आल्यानंतर मला कळलं की, भारतात सगळ्यात जास्त आरोग्यदायी जेवण हे महाराष्ट्रीय जेवण आहे.”
पुढे त्यांनी सांगितलं, “वरणभात हे माझं आवडतं जेवण आहे आणि ते मी आता रोजच खातो. काही लोकांनी माझं सुरुवातीचं वाक्य एडिट केलं आणि मी महाराष्ट्रीय जेवणाला गरीब जेवण म्हटल्याबद्दल माझ्यावर टीका केली. काही लोक वाक्य एडिट करून चुकीच्या पद्धतीनं पसरवतात. मला आता कोणत्या वादात अडकायचं नाही.”
दरम्यान, ‘द काश्मीर फाइल्स’, ‘द ताश्कंद फाइल्स’सारख्या सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे विवेक अग्निहोत्री ‘द बंगाल फाइल्स’ हा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यात पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार व सिम्रत कौरसारख्या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.