‘द कश्मीर फाइल्स’ , ‘द ताश्कंद फाइल्स’ यांसारखे सिनेमे करणारे बॉलीवूड दिग्दर्शक त्यांचा आगामी ‘द बंगाल फाइल्स’ हा नवा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. येत्या ५ सप्टेंबरला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. फाळणीनंतर बंगालमध्ये काय घडलं? त्याची कथा ‘द बंगाल फाइल्स’ सिनेमात पाहायला मिळणार असल्याचं ट्रेलरवरून दिसत आहे.

आगामी ‘द बंगाल फाइल्स’निमित्त दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री अनेक ठिकाणी मुलाखती देत आहेत. अशातच एका मुलाखतीत त्यांनी महात्मा गांधींबद्दल मत व्यक्त केलं आहे. ‘द बंगाल फाइल्स’ सिनेमात महात्मा गांधीजींच्या भूमिकेत अभिनेते अनुपम खेर पाहायला मिळत आहेत.

ट्रेलरमध्ये अनुपम खेर गांधीजींच्या भूमिकेत असून, ते डोक्यावर हात मारत असल्याचं पाहायला मिळत आहे. तेव्हा त्यावेळी त्यांची काय भूमिका होती? याबद्दल विवेक अग्निहोत्री यांना विचारण्यात आलं.

काँग्रेसमध्येसुद्धा गांधीजींचं कोणीच ऐकत नव्हतं : विवेक अग्निहोत्री

याबद्दल The Raunac Podcast ला दिलेल्या मुलाखतीत विवेक अग्निहोत्री म्हणाले, “गांधीजींचं कोणीच ऐकत नव्हतं. ते स्वत:च म्हणायचे की, मी म्हातारा झालो आहे, माझं कोणी ऐकत नाही. काँग्रेसमध्येसुद्धा त्यांचं कोणी ऐकत नव्हतं. स्वातंत्र्यानंतर आणि गांधींजींच्या मृत्यूनंतर त्यांचं सगळं ऐकलं जातं, असं दाखवलं गेलं. भारताच्या विभाजनाचा निर्णय आठ लोकांकडून छोट्या टेबलवर बसून घेण्यात आला होता. भारतातल्या लोकांनी विभाजनाचा निर्णय घेतला नव्हता.”

पुढे ते सांगतात, “माउंटबॅटननं नेहरू आणि जिनांना सांगितलं की, १२ वाजेपर्यंत तुम्ही आम्हाला सांगा की, पाकिस्तानची निर्मिती होईल. आजच बसून हा निर्णय घेतला पाहिजे. तेव्हा जिना म्हणाले की, १२ कशाला मी रात्री ११ वाजेपर्यंतच तुम्हाला सांगतो. अवघ्या १० आठवड्यांत भारताचं विभाजन झालं आहे. इतक्या मोठ्या राष्ट्राचं अवघ्या १० आठवड्यांत विभाजन झालं. त्याच्या दुसऱ्या दिवशी गांधीजींना याबद्दल कळलं.”

काँग्रेसच्या लोकांनी गांधीजींना बाजूला केलं होतं : विवेक अग्निहोत्री

पुढे विवेक अग्निहोत्री म्हणाले, “२ जूनला त्यांनी निर्णय घेतला आणि मग ३ जून रोजी गांधीजींना माउंटबॅटननं दिल्लीला बोलावलं. तेव्हा ते नोआखलीवरून आले होते. तेव्हा त्यांचं मौन व्रत होतं आणि एकही शब्द न बोलता, त्यांनी कागदावर आपलं म्हणणं लिहिलं. भारताचं विभाजन झालं आहे, हे गांधीजींना माहीतच नव्हतं. त्यांना नंतर कळलं. तेव्हा काँग्रेसच्या लोकांनी गांधीजींना बाजूला केलं होतं. तेव्हाच्या सक्रिय राजकारणात गांधीजी सहभागी नव्हते. त्यांचं कोणीही ऐकत नव्हतं. ही काँग्रेसची तेव्हाची अवस्था होती. काँग्रेसचं १०० टक्के योगदान आहे, त्याला आपण नाकारू शकत नाही. पण, देशाला नुकसान पोहोचवण्यात आणि भारताचं जे विभाजन झालं, त्यात काँग्रेसची एक मोठी भूमिका आहे.”