Kumar Sanu Sends Legal Notice To Ex Wife :आपल्या आवाजाने चर्चेत असणारे बॉलीवूडचे लोकप्रिय गायक कुमार सानू गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. कुमार सानूंची एक्स पत्नी रीटा यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीतून कुमार सानू आणि त्यांच्या कुटुंबावर काही गंभीर आरोप केले होते.

रीटा भट्टाचार्य यांनी त्यांच्या गरोदरपणात कुमार सानू व त्यांच्या कुटुंबीयांनी तिला अन्न आणि मूलभूत गरजांपासून वंचित ठेवले, तसंच मानसिक त्रास दिला असल्याचं म्हटलं होतं. आता या आरोपांवर कुमार सानू यांनी कायदेशीर कारवाई केली आहे.

India Today च्या वृत्तानुसार, रीटा भट्टाचार्य यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देत वकील सना रईस खान यांनी कुमार सानू यांच्यावतीने या सगळ्या आरोपांचा निषेध केला आहे आणि हे आरोप खोटे असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच त्यांनी एक अधिकृत निवेदन जारी करत या आरोपांना उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, “गेल्या ४० वर्षांपासून कुमार सानू यांनी आपलं संपूर्ण आयुष्य संगीताला वाहिलं आहे. त्यांच्या गाण्यांनी अनेक लोकांना आनंद दिला आहे. अशा खोट्या आरोपांमुळे काही काळ चर्चा निर्माण होऊ शकते, पण ज्यांनी पिढ्यानपिढ्या लोकांच्या मनात संगीताचं स्थान निर्माण केलं, अशा कलाकारावर त्याचा परिणाम होऊ शकत नाही.”

आपल्या निवेदनात पुढे बोलताना सना रईस खान यांनी सांगितले की, कुमार सानू यांच्यावर करण्यात आलेल्या खोट्या आरोपांवर कायदेशीर मार्गाने कारवाई करण्यात येईल. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं, “कोणीही जाणूनबुजून कुमार सानू यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला तर त्यावर कायद्याच्या माध्यमातून कठोर कारवाई केली जाईल.”

दरम्यान, फिल्म विंडोबरोबरच्या संभाषणात रीटा म्हणाल्या, “तो उत्तम गायक आहे यात शंका नाही, पण माणूस म्हणून त्यांच्याबद्दल जितकं कमी बोलावं तितकं चांगलं. त्यांनी मला कधीच घराबाहेर पडू दिलं नाही. मी मुलगा जानच्यावेळी गरोदर होते, तेव्हा मला नीट जेवणही दिलं जात नव्हतं, मला सतत त्रास दिला जात असे.”

तसंच रीटा यांनी “मी गर्भवती असताना त्यांनी मला कायदेशीर लढाईत ओढलं. त्याचं दुसऱ्या व्यक्तीबरोबर अफेअर सुरू होतं. मी तेव्हा खूप लहान होते. मला असं वाटलं की, माझं संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झालं. माझं कुटुंबही धक्क्यात होतं” असंही रीटा यांनी सांगितलं होतं. या सर्व आरोपांना उत्तर देण्यासाठी आता कुमार सानू यांच्याकडून कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.